...म्हणे मित्रांनी सरप्राईझ दिले!, तलवारीने २१ केक कपणारा सापडला
By गौरी टेंबकर | Published: September 19, 2022 04:44 PM2022-09-19T16:44:08+5:302022-09-19T16:44:34+5:30
अल्पवयीन असल्याने अटक नाही
मुंबई: वाढदिवस साजरा करण्यासाठी तलवारीने २१ केक कापणाऱ्या १७ वर्षीय तरुणाला एम एच बी कॉलनी पोलिसांनी शोधून काढले आहे. अल्पवयीन असल्याने त्याला अटक करण्यात आली नसून आपल्याला मित्रांनी सरप्राइज दिले असे उत्तर त्याने तपास अधिकाऱ्याना चौकशी दरम्यान दिल्याचे वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
बोरिवली पश्चीमच्या सलमान हॉटेल गल्ली क्रमांक १४ याठिकाणी त्याने उघडपणे तलवारीने केक कापला होता. हा प्रकार १६ सप्टेंबर रोजी घडल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा तरुण सध्या अकरावीच्या वर्गात शिकत आहे. त्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये तो ज्या तलवारीने केक कापत आहे ती तलवार देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे. जी त्याने त्याच्या पलंगाच्या खाली दडवून ठेवली होती असे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
तसेच वाढदिवसाच्या रात्री कोणीतरी माझ्या हातात ती अचानक दिली असेही उत्तर त्याने पोलिसाना दिले आहे. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तो अल्पवयीन असल्याने त्याला अटक करण्यात आली नाही. त्याच्या पालकांना बोलावून याबाबत नोटीस देत त्याला जुवेनाईल कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले असल्याचे अधिकाऱ्याने नमूद केले. मित्रांनी सरप्राइज दिले असल्याचेही त्याचे म्हणणे असून विद्यार्थ्याकडे तलवार आली कुठून याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
व्हिडीओ झाला व्हायरल
सदर घटनेचे शूटिंग करून तो व्हिडियो त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यानंतर तो सर्वत्र व्हायरल झाल्यावर एमएच बी कॉलनी पोलीस ठाण्याने त्याची दखल घेत तरुणावर संबंधित कलामांतर्गत गुन्हा दाखल केला होता.