पिंपरीत उसने दिलेल्या पैशांचा तगादा लावल्याने मित्रांनीच केला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 08:08 PM2019-05-08T20:08:17+5:302019-05-08T20:11:26+5:30

हातउसने दिलेल्या या रकमेसाठी तगादा लावल्याने मित्राने रुमालाने गळा आवळून तरूणाचा खून केला.

friends murdered due to money issues | पिंपरीत उसने दिलेल्या पैशांचा तगादा लावल्याने मित्रांनीच केला खून

पिंपरीत उसने दिलेल्या पैशांचा तगादा लावल्याने मित्रांनीच केला खून

googlenewsNext
ठळक मुद्देसौताडा घाटात मृतदेह टाकला: वाकड पोलिसांनी केली गुन्हाची उकल

पिंपरी : मैत्रिणीच्या नावावर असलेल्या फ्लॅटवर कर्ज काढून ती रक्कम मित्राला वापरण्यास दिली. मात्र, हातउसने दिलेल्या या रकमेसाठी तगादा लावल्याने मित्राने रुमालाने गळा आवळून तरूणाचा खून केला. मृतदेह अहमदनगर जिल्हयातील जामखेडजवळील सौताडा घाटात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अठरा दिवसांत तपास करून वाकड पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला असून दोघांना अटक केली आहे. 
वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस सुनील भिसे (वय २८, रा. रहाटणी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दत्ता नवनाथ बिरंगळ (वय ३०, रा. नेवाळेवस्ती, चिखली, मूळ - सोनेगाव, ता. जामखेड, जि. नगर) आणि समाधान बिभीषण भोगल (वय २४, रा. जाधववाडी, चिखली, मूळ - बोरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) या दोघांना अटक केली आहे. 
तेजस भिसे हा जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचे काम करत होता. त्याने त्याच्या मैत्रिणीच्या नावावर चिखली येथे असलेल्या फ्लॅटवर बँकेतून कर्ज घेतले. ती रक्कम त्याने दत्ता याला हातउसने वापरण्यासाठी दिले. परंतु, ती रक्कम दत्ता याने वेळेत परत न केल्याने बँकेचे हप्ते भरणे बंद झाले. कर्जफेडीसाठी बँकेने तेजस आणि त्याच्या मैत्रिणीकडे तगादा लावला. यामुळे तेजस दत्ताकडे वारंवार पैशाची मागणी करत होता. त्यावरून त्यांच्यात वाद होत होते. २० एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता तेजस धुळे, अमरावती येथे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. नंतर त्याने त्याचा मावसभाऊ नितेश अंबादास भोरे याला फोन करून सांगितले की, तो दत्ता बिरंगळ याच्यासोबत आहे. २१ एप्रिल रोजी तेजस जी मोटार घेऊन गेला होता ती मोटार काळेवाडी येथील भोईर लॉन्स जवळ चावीसह सोडली असल्याचा मॅसेज नितेशच्या मोबाईलवर आला. 
परंतु, तेजस घरी न आल्याने तसेच त्याच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने त्याचा भाऊ प्रवीण सुनील भिसे (वय २९) यांनी वाकड पोलिस ठाण्यात तेजस हरविल्याची तक्रार नोंदविली. दत्ता बिरंगळ याने २२ एप्रिलला दुपारी फोन बंद केला. त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यावरून बिरंगळ याच्या विरोधात तेजसच्या अपहरणाचा गुन्हा नोंदवला. त्यानंतर वाकड पोलिसांनी कसून तपास केला आणि दत्ता आणि समाधान या दोघांना पकडले. त्यानंतर दोघांनी खूनाची कबूली दिली. मोटारीतून जात असताना जामखेड येथे रुमालाने गळा आवळून तेजसचा खून केला.  मृतदेह नगरजवळील सौताडा घाटामध्ये ६० फुट दरीत फेकून दिला. तेजसचे कपडे, बेल्ट, बूट व इतर साहित्य राजुरी येथे जाळल्याची कबूली दिली आहे. 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, ज्ञानेश्वर साबळे, फौजदार हरीश माने, सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, बापूसाहेब धुमाळ, नितीन ढोरजे, दीपक भोसले, रमेश गायकवाड, जावेद पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: friends murdered due to money issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.