फेसबुकवरील मैत्री वृद्ध महिलेला पडली महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 01:16 AM2020-07-10T01:16:24+5:302020-07-10T01:18:44+5:30
वसई पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालासोपारा : वसईच्या गिरीज येथे राहणाऱ्या ६९ वर्षीय वयोवृद्ध महिलेशी सोशल मीडियाद्वारे मैत्री करून तिला आमिष दाखवून तब्बल ५७ लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. वसई पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेरी मायकल अँड्राडीस (६९) या गिरीज गावातील नालाईवाडी येथे राहतात. ९ जून ते २३ जून २०२० दरम्यान लिओ जेकब यांनी मेरी यांच्या फेसबुक अकाऊंटवर फ्रें ड रिक्वेस्ट पाठवून सतत फोन करून मैत्री केली. लिओ याने ब्रिटीश एअरवेजमध्ये पायलट असल्याचे खोटे सांगून इंडस्ट्री विभागात जमीन घ्यायची असून तुझ्या नावावर घे, असे आमिष दाखवून पैशाचे कुरिअर पाठवणार असल्याचे मेरी यांना सांगितले. नंतर जोशीलाने कुरिअरची व्हॅल्यू जास्त असून सरकारी टॅक्स भरावा लागेल अशी बतावणी करून मेरी यांना गिरीज येथील बँकेतून निरनिराळ्या बँकेच्या खात्यामध्ये ५६ लाख ३६ हजार रुपये भरण्यास भाग पाडून अपहार केला. मेरी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी वसई पोलीस ठाण्यात बुधवारी जाऊन त्या दोघांविरोधात तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे.