फेसबुकवरील मैत्रीद्वारे शिक्षिकेला नायजेरियन टोळीने लावला चुना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 08:16 PM2019-04-08T20:16:48+5:302019-04-08T20:17:54+5:30

चौकशीतून या दोघांनी शेकडो नागरिकांना अशा प्रकारे गंडा घातल्याची कबुली दिली आहे. 

The friendship of Facebook looted money of teacher by the Nigerian gang | फेसबुकवरील मैत्रीद्वारे शिक्षिकेला नायजेरियन टोळीने लावला चुना

फेसबुकवरील मैत्रीद्वारे शिक्षिकेला नायजेरियन टोळीने लावला चुना

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी या प्रकरणी बंगळुरूहून चिनेडु श्रीवेंसा ओरजी, माइक उड्डे जिडेन या दोन नायझेरियन तरुणांना अटक केली आहे.मात्र फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षिकेने थेट ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात अरविंदकुमार विरोधात तक्रार नोंदवली.

मुंबई - फेसबुकवर अनोळखी व्यक्तीने मैत्री करून ना.म.जोशी मार्ग परिसरात राहणाऱ्या शिक्षिकेला काही दिवसांपूर्वी ६८ हजार रुपयांना गंडा घातला होता. या गंडा घालणाऱ्या नायझेरियन टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी बंगळुरूहून चिनेडु श्रीवेंसा ओरजी, माइक उड्डे जिडेन या दोन नायझेरियन तरुणांना अटक केली आहे. यांच्या चौकशीतून या दोघांनी शेकडो नागरिकांना अशा प्रकारे गंडा घातल्याची कबुली दिली आहे. 

ना.म.जोशी मार्ग परिसरात कुटुंबियांसोबत राहणारी शिक्षिका या वरळी येथील एका नामांकीत हायस्कूलमध्ये शिक्षिका आहेत. सप्टेंबर २०१८ महिन्यात त्यांना फेसबुक अकाऊंटवरील मेसेंजरवर अरविंद कुमार नावाच्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्याची रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर दोघेही मेसेंजर अॅपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. अरविंदने युगंधरा यांना आपण अमेरिकन नेव्हीत कॅप्टन पदावर असल्याचं सांगितलं होतं. तसंच सध्या अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणेसोबत पोलंडला आलो असल्याचं सांगितलं. काही महिने दोघांमध्ये बोलणे सुरू असल्याने अरविंदने पोलंडमधून शिक्षिकेला एक गिफ्ट पाठवायचे असल्याचे सांगत त्यांचा मोबाइल नंबर मागितला. फसवणूक करणाऱ्याने शिक्षिकेचा विश्वास संपादन केला असल्याने तिने मोबाइल क्रमांक देखील अरविंदला दिला. त्यावेळी शिक्षिकेच्या व्हाॅट्स अॅपवर अरविंदरने सोन्याच्या नेकलेसचा फोटो पाठवला आणि हे गिफ्ट असल्याचं लिहिलं होतं. १२ आॅक्टोबर रोजी शिक्षिकेच्या फोनवर एक फोन आला. त्यावेळी समोरील महिलेने आपण दिल्लीच्या कस्टम आॅफीसमधून बोलत असल्याचं सांगितलं. तुमचे पार्सल आले असून त्यासाठी तुम्हाला ६८ हजार रुपये कस्टम ड्युटी भरावी लागेल असं सांगण्यात आलं. त्यानंतर शिक्षिका यांनी महिलेने दिलेल्या अकाऊंटवर ६८ हजार ५०० रुपये पाठवले. पैसे पाठवलेले अकाऊंट हे झाकी उल्ला शरीफ या नावाच्या व्यक्तीचं होतं. पैसे पाठवल्याचं शिक्षिकेने नवी दिल्लीतील त्या महिलेस फोन करून सांगितले. मात्र, पुन्हा दुपारी ३ वाजता त्या महिलेचा फोन आला. त्यावेळी तिने त्या पार्सलमध्ये काही विदेशी चलन आढळून आले असून तुम्हाला त्याचा दंड म्हणून २ लाख भरावे लागतील असं सांगितले. दंड न भरल्यास तुम्हाला शिक्षा होऊ शकते असंही घाबरवलं. शिक्षिकेने अरविंदला फोन करून विचारले असता त्याने देखील आपण तुला खर्चासाठी ३० हजार डाॅलर पाठवले असल्याचं सांगितलं. तोपर्यंत दिल्लीतील त्या महिलेने पुन्हा कोटक महिंद्रा या बँकेच्या खात्यावर २ लाख रुपये भरण्यास सांगितलं. त्या महिलेवर संशय आल्याने शिक्षिकेने चतुराईने शुरजी वल्लभदास रोड, बलार्ड इस्टेट येथील कस्टम आॅफीसला भेट देऊन आपल्या नावावर कोणते पार्सल आले आहे का ते तपासलं. मात्र फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षिकेने थेट ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात अरविंदकुमार विरोधात तक्रार नोंदवली.

Web Title: The friendship of Facebook looted money of teacher by the Nigerian gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.