'इंस्टा'वरुन झाली मैत्री, हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या व्यापाऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 03:12 PM2021-06-17T15:12:46+5:302021-06-17T15:13:26+5:30
व्यापाऱ्याची सोशल मीडियावरील एका महिलेसोबत मैत्री झाली होती. त्यानंतर, त्या मैत्रिणीने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यातूनच ही आत्महत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
नवी दिल्ली - हरियाणाच्या फरीदाबादमधील एक हनीट्रॅपचे सनसनी प्रकरण समोर आले आहे. फरीदाबादच्या सेक्टर 16 येथील रहिवाशी असलेल्या व्यापाऱ्याने बुधवारी सेक्टर 17 मधील एका शाळेसमोर स्वत:ला पेटवून घेतले. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच, पोलिसांच्या फॉरेन्सीक पथकाने घटनास्थळी धाव घेत पुरावे जमा केले आहेत.
व्यापाऱ्याची सोशल मीडियावरील एका महिलेसोबत मैत्री झाली होती. त्यानंतर, त्या मैत्रिणीने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यातूनच ही आत्महत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. फरीदाबादमधील व्यापाऱ्याची इंस्ट्राग्रामवरुन एक महिलेसोबत मैत्री झाली होती. दोघांनीही एकमेकांचे फोन नंबर घेतले, त्यानंतर दोघांचाही संवाद सुरू झाला. महिलेकडून ई-वॉलेटद्वारे सातत्याने पैशाची मागणी होऊ लागली. त्यानंतर, महिलेने व्यापाऱ्याला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये बोलावले. त्यावेळी, महिलेसोबत एक व्यक्ती आणि इतर महिलाही होत्या. त्यांनी भेटीचा व्हिडिओ बनवला.
महिलेनं हॉटेलमधील भेटीच्या व्हिडिओवरुन व्यापाऱ्यास ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यातूनच काही रुपयेही महिलेने घेतले होते, पण सातत्याने पैशांची मागणी करण्यात येत होती. नुकतेच महिलेने 3 लाख रुपये मागितले होते, याबाबत व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रारही दिली. मंगळवारीच याप्रकरणी क्राईम ब्रांचकडे तपास देण्यात आला आहे.
व्यापाऱ्याची आत्महत्या
महिलेच्या सातत्याच्या पैशाच्या मागणीमुळे त्रस्त होवूनच व्यापाऱ्याने सेक्टर 16 मध्ये आत्महत्या केली. पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळावरुन पुरावे जमा केले. आरोपींना शोधून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक नरेश कुमार यांनी सांगितले.