लंडनच्या तरुणासोबतची मैत्री पडली महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 02:39 AM2020-03-17T02:39:26+5:302020-03-17T02:39:51+5:30
कोपरखैरणे सेक्टर ८ येथे राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणीसोबत हा प्रकार घडला आहे. तिची बेन्सन मर्गन नावाच्या व्यक्तीसोबत फेसबुकवर ओळख झाली होती.
नवी मुंबई : फेसबुकवरून लंडनच्या तरुणासोबत झालेली मैत्री तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. त्याने लग्नाचे आमिष दाखवून भेटीसाठी भारतात येत असल्याचे सांगितले. परंतु दिल्ली विमानतळावर आल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेत अडकल्याचे सांगून स्वत:च्या सुटकेच्या बहाण्याने तिला ९ लाख ७७ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.
कोपरखैरणे सेक्टर ८ येथे राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणीसोबत हा प्रकार घडला आहे. तिची बेन्सन मर्गन नावाच्या व्यक्तीसोबत फेसबुकवर ओळख झाली होती. त्याने तो लंडनचा रहिवासी असल्याचे सांगून तिच्याशी मैत्री केली होती. त्यांच्यातली जवळीक वाढल्यानंतर त्याने भेटीसाठी भारतात येत असल्याचे सांगितले. याचदरम्यान २ मार्चला सदर तरुणीला एका व्यक्तीने फोन करून दिल्ली विमानतळावरील अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. त्यांनी बेन्सन याच्याकडे ५० हजार पाउंड आढळल्याने त्याला ताब्यात घेतले असून दंडाची रक्कम भरल्यानंतर त्याला सोडले जाईल, असेही सांगितले. या वेळी त्या व्यक्तीने बेन्सन याच्यासोबतही तिचे बोलणे करून दिले. या वेळी बेन्सन याने आपल्याला डांबून ठेवले असून, विमानतळावरून सुटल्यानंतर तिला दंडाची भरलेली रक्कम परत देतो, असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणीने सुरुवातीला ६५ हजार रुपये भरले. परंतु त्यानंतरही वेगवेगळ्या कारणांसाठी तिच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली. तर सदर तरुणीही फोनवरील व्यक्ती सांगेल त्याप्रमाणे संबंधित बँक खात्यात पैसे पाठवत होती. तिने ९ लाख ७७ हजार रुपये भरले. परंतु संपूर्ण प्रकरणावर संशय आल्याने तिने पैसे पाठवणे बंद केले. शनिवारी बेन्सन याने तिला फोन करून लंडनला जात असल्याचे सांगितल्याने तिने कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.