सोशल मिडियावरिल मैत्री अन् व्यावसायिकाला सव्वा कोटीचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 10:15 PM2021-10-02T22:15:48+5:302021-10-02T22:16:23+5:30
Cyber Crime : त्रिकूट जाळयात, सायबर पोलिसांची कारवाई
मुंबई : सोशल मिडियावरुन ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. यातूनच आजारी तसेच आर्थिक अड़चण असल्याचे सांगत ५ महिन्यात व्यावसायिकाला सव्वा कोटी रूपयांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार सायबर विभागाच्या कारवाईत समोर आला आहे. याप्रकरणी उत्तर विभागाच्या सायबर पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना अटक केली आहे.
राणी पंकज सारंग (४२), रुचिका हातीपकर (२४) आणि प्रसाद भानुशाली (२७) अशी अटक करण्यात आलेल्या त्रिकूटाचे नाव आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील रहिवासी असलेली राणी यातील मुख्य आरोपी आहे. तिने टिंडर अँँपवरून व्यावसायिकासोबत ओळख झाली. तिने तक्रारदार यांना त्यांच्या कंपनीतील सहकाऱ्याची पत्नी असल्याचे सांगत बनावट फेसबुक अकाउंटवरून रिक्वेस्टही पाठवली. दोघांमध्ये संवाद सुरु झाला. पुढे स्वतः तसेच मुले आजारी असल्याचे सांगत पैसे उकळण्यास सुरुवात केली. तिच्या अन्य साथीदारांनीही मध्यस्थी घेत वेगवेगळी कारणे पुढे करत पैसे काढले.
राणीने सुरु केलेल्या नाटकात तिचा मृत्यू झाल्याचे भासवून
तिच्या मुलीने आणखीन पैसे घेतले. यात १८ एप्रिल ते २१ सप्टेबर दरम्यान ठगांनी १ कोटी ११ लाख ७९ हजार रुपये उकळले आहे. पुढे टोळीतील सरस्वती नावाच्या महिलेने पैसे न दिल्यास आत्महत्येची धमकी दिली. अखेर यात फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी सायबर पोलिसांकड़े धाव घेतली. तांत्रिक तपासातून पथक अटक त्रिकूटापर्यंत पोहचले. यात, त्यांच्या बँक खात्यातील १७ लाख रुपये गोठविण्यात आले आहे. तसेच त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरु आहे.
ठगीच्या रक्कमेतून सोने खरेदी
ठगीच्या रक्कमेतून खरेदी केलेले २२ लाख किंमतीचे दागिने सायबर पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच त्यांच्या अन्य बँक खात्याचे डेबिट, क्रेडिट कार्ड, पासबुक, चेकबुकही पथकाने जप्त केले आहे.