गुरुग्राम ते मध्यप्रदेश! पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपीचा तब्बल 400 किमी पायी प्रवास, अखेर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 11:13 AM2023-10-06T11:13:15+5:302023-10-06T11:14:36+5:30
आरोपी गुरुग्रामपासून 400 किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशात पायीच पोहोचला, त्यामुळे पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रेस करता आले नाही
हरियाणातील गुरुग्राम पोलिसांनी तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून 9 महिन्यांपासून फरार असलेल्या तरुणाला अटक केली आहे. जानेवारी महिन्यात आरोपीविरुद्ध बादशाहपूर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. आरोपीला पकडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागल्याचे पोलिसांनी सांगितले. कारण तो पोलिसांपासून वाचण्यासाठी चतुराईने पावलं टाकत होता.
बलात्कार केल्यानंतर आरोपी गुरुग्रामपासून 400 किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशात पायीच पोहोचला, त्यामुळे पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रेस करता आले नाही. गुरुग्रामचे एसीपी प्रियांशू दीवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ड्रे उर्फ गोविंद हा मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात मजूर म्हणून काम करत होता. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तेथे छापा टाकून त्याला अटक केली. आरोपी हा मोस्ट वाँटेड गुन्हेगार आहे. त्याच्यावर 5 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
चौकशीत आरोपीने सांगितले की तो गुरुग्राममध्ये मजूर म्हणून काम करत असे आणि तेथील झोपडपट्टीत राहत होता. 12 जानेवारी रोजी शेजारी राहणाऱ्या तीन वर्षीय मुलीचे वडील कामावर गेले असता संधी साधून त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि पळून गेला. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो गुरुग्राम येथून पायी चालत 400 किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात असलेल्या बरभान गावात पोहोचला. तिथे राहून मजूर म्हणून काम करू लागला. मात्र पोलिसांनी त्याला शोधून काढले.
चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याला पोलिसांपासून पळून जायचे होते. त्यामुळे गावी पायी जायचं ठरवलं. संपूर्ण प्रवासात कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीत चढलो नाही. आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे गुरुग्राम पोलिसांनी सांगितले. पुढील तपासासाठी न्यायालयाकडून कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.
एसीपी दीवान म्हणाले की, गुरुग्राम आणि फरीदाबाद व्यतिरिक्त मध्य प्रदेशातही आरोपींविरुद्ध 2 एफआयआर नोंदवले आहेत. 2020 मध्ये आरोपी ड्रे याने फरीदाबादमध्ये पत्नीवर जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी कलम 307 अन्वये एफआयआर नोंदवून त्याला अटक केली होती, परंतु न्यायालयात हजर होत असताना तो फरार झाला होता. त्याच्यावर मध्य प्रदेशात वाद आणि मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.