डेबिट कार्ड बंद होणार असल्याचे सांगून ज्येष्ठाला आठ लाखांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 06:52 PM2020-09-22T18:52:50+5:302020-09-22T18:53:46+5:30
आरोपीने ज्येष्ठ व्यक्तीला आयसीआयसीआय बँकेच्या मुंब्रातील वांद्रा कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले.
पिंपरी : डेबिट कार्ड बंद होणार असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून तब्बल आठ लाख रुपये काढल्याची घटना निगडी गावठाणात घडली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
शिवराम गोपाळ वैद्य (वय ५७, रा. सुभश्री, निगडी गावठाण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैद्य यांना १३ मे २०२० रोजी एका मोबाइल क्रमांकावरून फोन आला. आयसीआयसीआय बँकेच्या मुंब्रातील वांद्रा कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे डेबिट कार्ड बंद होणार आहे. त्यासाठी तुमच्या बोटांचे ठसे लागतील. ठसे घेण्यासाठी आमचा माणूस नंतर येईल. तोपर्यंत मोबाइलवर आलेली सर्व माहिती मला सांगा. या दरम्यान वैद्य यांना त्यांच्या मोबाइल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड (ओटीपी) आला. त्याची माहिती संबंधित व्यक्तीला दिली. त्यानंतर वैद्य यांच्या खात्यातून ७ लाख ९८ हजार ९९८ रुपये अन्य खात्यात गेले. याप्रकरणी सायबर पोलीस तापस करीत असून, निगडी पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
-----------------