तडीपार सराईत गुंडाची दहशत; पोलिसांनी अवैध शस्त्रासह केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 07:23 PM2019-04-19T19:23:32+5:302019-04-19T19:26:52+5:30
सराईत गुंडास बेकायदा शस्त्रासह गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक ६ ने जेरबंद केले.
मुंबई - ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानखुर्द परिसरात चोरी आणि स्त्रियांचे विनयभंगाचे गुन्हे करणाऱ्या एका कुख्यात गुंडाची दहशत होती. त्याच्यावर चोरीचे २ गुन्हे आणि विनयभंगाचे २ गुन्हे दाखल होते. त्यातील विनयभंगाच्या एका गुन्ह्यात तो १ वर्ष कारावासाची शिक्षा भोगून बाहेर आलेला होता. या गुंडास ट्रॉम्बे पोलीस ठाण्याकडून डिसेंबर २०१८ साली मुंबई आणि ठाण्यातून २ वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलं होतं. तरीसुद्धा या अभिलेखावरील आरोपी लपूनछपून महाराष्ट्र नगर आणि चिता कॅम्प परिसरात येऊन लोकांना मारहाण करून दहशत पसरवत असल्याचे आढळून आले. त्यानंतर या सराईत गुंडास बेकायदा शस्त्रासह गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक ६ ने जेरबंद केले.
कक्ष ६ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांना हद्दपार केलेला आरोपी बेकायदेशीर शस्त्रासह महाराष्ट्र नगर परिसरात नेणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यानुसार मानखुर्द येथील पत्राचाळ, म्हाडावसाहतीच्या पाठीमागे पोलिसांनी सापळा लावला होता. दरम्यान हद्दपार आरोपी हा मानखुर्द रेल्वे स्थानकाकडून आला तेव्हा त्याला पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्या अंगझडतीत त्याच्याकडे १ देशी बनावटीचे अग्निशस्त्र , २ जिवंत काडतुसे आढळून आली. गुन्हेगारी अभिलेखावर असलेल्या आरोपीला मुंबई शहरातून हद्दपार केलेले असूनही या आदेशाचा भंग करून तो मुंबईत प्रवेश करून अवैध शस्त्र बाळगल्याने त्याच्या विरुद्ध ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.