दोन अपहृत बालिकांसह फरार आरोपींना पकडले!
By संतोष वानखडे | Published: March 27, 2023 07:57 PM2023-03-27T19:57:27+5:302023-03-27T19:57:37+5:30
आरोपीस तळोजा कॅम्प, मुंबई येथून ताब्यात घेतले
संतोष वानखडे / वाशिम : गत ३ वर्षांपासून अपहरणाच्या प्रलंबित प्रकरणातील २ अपहृत बालिका व आरोपींचा शोध घेण्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षास यश आले आहे. एका आरोपीस कर्जत (जि. रायगड) तर दुसऱ्या प्रकरणातील आरोपीस तळोजा कॅम्प, मुंबई येथून ताब्यात घेत सोमवारी (दि.२७) पिडीत बालिकांना कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीतील पळवून नेलेल्या मुलींचा शोध व तपासावर दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींचा शोध घेण्यासाठी अशी प्रकरणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, वाशिम यांच्याकडे वर्ग केली जातात. मागील ३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या २ अपहरणाच्या गुन्ह्यातील अपहृत बालिका व आरोपींचा शोध घेण्यात आला. कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भादंवी कलम ३६३ मधील ३ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस कर्जत (जि.रायगड) येथून ताब्यात घेत पिडीतेची सुटका करून तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. दुसऱ्या प्रकरणात मंगरूळपीर पोलीस स्टेशन येथे भादंवी कलम ३६३ मधील आरोपीस तळोजा कॅम्प, मुंबई येथून ताब्यात घेत पिडीतेस तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.