लाचखोरी प्रकरणात फरार शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांना अटक, एसीबीने अशा ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 11:07 AM2021-08-13T11:07:47+5:302021-08-13T11:10:11+5:30
Vaishali Veer Jhankar Arrest News: वैशाली झनकर यांनी शिक्षणसंस्थांच्या शाळांच्या वीस टक्के अनुदानानुसार नियमित वेतन सुरू करण्याकरिता त्यांच्या शासकीय वाहनचालकामार्फत एका शिक्षण संस्थाचालकाकडून आठ लाख रुपयांची लाच स्वीकारली होती.
नाशिक - आठ लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात फरार असलेल्या शिक्षणाधिकारी डॉक्टर वैशाली वीर झनकर यांना अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. (Vaishali Veer Jhankar Arrest News) वैशाली झनकर यांनी शिक्षणसंस्थांच्या शाळांच्या वीस टक्के अनुदानानुसार नियमित वेतन सुरू करण्याकरिता त्यांच्या शासकीय वाहनचालकामार्फत एका शिक्षण संस्थाचालकाकडून आठ लाख रुपयांची लाच स्वीकारली होती. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र त्या एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्या होत्या. (Fugitive education officer Vaishali Veer Zankar arrested in bribery case)
सोमवारी नाशिकच्या जिल्हा परिषदेसमोर शिक्षण संस्थाचालकांकडून झनकर यांच्या शासकीय वाहनचालकाने आठ लाख रुपयांची स्वीकारली होती. त्याला एसीबीने ताब्यात घेतले होते. मात्र रात्री सात वाजेनंतर महिला आरोपीला अटक करता येत नाही. या कायद्यातील नियमाचा फायदा घेऊन झनकर यांनी मंगळवारी सकाळी हजर राहू, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लेखी लिहून दिले होते. मात्र त्यानंतर मंगळवारी सकाळी फरार झाल्या होत्या. या प्रकरणात शासकीय वाहन चालक आणि एका शिक्षकाला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याने दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान, वैशाली झनकर यांनी काल नाशिकच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर आज सुनावणी होणार होती. मात्र त्यापूर्वीच ठाणे एसीबीने धडाकेबाज कारवाई करत वैशाली झनकर यांना बेड्या ठोकल्या. ठाणे अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्या टीमने वेगाने सूत्रे हलवत वैशाली झनकर यांना अटक करण्यात यश मिळवले. आता झनकर यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
काय आहे प्रकरण
शासनाने मंजूर केलेल्या दोन शिक्षणसंस्थांच्या शाळांच्या वीस टक्के अनुदानानुसार नियमित वेतन सुरू करण्याकरिता झनकर यांनी कार्यादेश काढण्यासाठी लाचेची रक्कम मागितली होती. यानंतर तक्रारदार संस्थाचालकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्याचे महासंचालकांकडे तक्रार केली होती. यानंतर मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील सापळा अधिकारी पल्लवी ढगे यांच्या पथकाने नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारालगत सापळा रचला होता. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास तडजोड व्यवहारात ठरल्याप्रमाणे आठ लाखांची रक्कम स्वीकारण्यासाठी झनकर यांचा शासकीय मोटार वाहनचालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले हा जिल्हा परिषदेबाहेरील सिग्नलजवळ आला असता, त्याने तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताच पथकाने त्यास रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता झनकर यांच्या आदेशान्वये त्याने रक्कम घेतल्याचे समजल्यानंतर पथकाने जिल्हा परिषदेच्या वास्तूमध्ये धडक देत झनकर यांनाही चौकशीकरिता ताब्यात घेतले होते. मात्र त्यानंतर वैशाली झनकर ह्या फरार झाल्या होत्या.