अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ; सत्र न्यायालयाकडून समन्स जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 17:09 IST2021-10-01T17:07:49+5:302021-10-01T17:09:59+5:30
Anil Deshmukh And Ed : ईडीने देशमुख तपसात सहकार्य करत नसल्याची तक्रार न्यायालयात सांगितली आहे.

अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ; सत्र न्यायालयाकडून समन्स जारी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडूनअनिल देशमुखांना समन्स जारी करण्यात आलं आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत त्यांना त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ईडीने देशमुख तपसात सहकार्य करत नसल्याची तक्रार न्यायालयात सांगितली आहे.
दरमहा शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपावरून केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तीन महिन्यांपासून कोणत्याही चौकशीला हजर न राहिल्याने केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि प्रभारी पोलीस महासंचालक संजय पांडे या दोघांना समन्स बजाविले असल्याचे समजते. देशमुख यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठीची दोघांची भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.
मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी टाकलेल्या 'लेटर बॉम्ब'नंतर देशमुख अडचणीत आले. सीबीआय व ईडीने त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर ते एकदाही चौकशीला सामोरे गेलेले नाहीत.
ईडीने त्यांना तब्बल ५ वेळा समन्स बजाविले आहे, मात्र वकिलाच्या माध्यमातून विविध कारणे देत त्यांनी चौकशी टाळली आहे. त्यांच्यावर ‘लूक आउट’ नोटीस जारी करूनही ते हजर झालेले नाहीत. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने सीबीआयने त्याबाबत मुख्य सचिव कुंटे व डीजीपी पांडे यांना समन्स बजाविले आहेत.