नक्षलविरोधी अभियानाला यश; ६ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 04:30 PM2019-11-27T16:30:08+5:302019-11-27T16:33:41+5:30
पाच महिलांचा समावेश : ३१ लाख ५० हजारांचे होते बक्षीस
गडचिरोली - नक्षलविरोधी अभियानांतर्गत राबविल्या जाणाऱ्या आत्मसमर्पण योजनेत बुधवारी (दि.२७) सहा नक्षलवाद्यांनी गडचिरोलीपोलिसांपुढे आत्मसमर्पण करून नक्षल चळवळीचा त्याग केला. यात कसनसूर दलम कमांडरसह त्याची पत्नी आणि इतर ४ महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या सर्वांवर गृह विभागाने ३१ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक महादेव तांबडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, मोहीतकुमार गर्ग, मनिष कलवानिया यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना पांढरा दुपट्टा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये वाढलेला संवाद, त्यातून नागरिकांच्या समस्या दूर करण्यात पोलिसांना येत असलेले यश, पोलिसांनी मिळविलेला नागरिकांचा विश्वास, नक्षलवाद्यांविरूद्धची आक्रमकता आणि त्यामुळे नक्षलवादी कारवायांना बसलेली खिळ याला कंटाळून नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.
Gadchiroli: 6 naxals including 5 women surrendered, today. The naxals had total reward of Rs 31,50,000 on them. #Maharashtrapic.twitter.com/X8qZeid1CX
— ANI (@ANI) November 27, 2019
संदीप वड्डे- संदीप उर्फ महारू चमरू वड्डे (३०) हा कसनसूर दलमचा कमांडर होता. त्याच्यावर चकमकीचे १७ गुन्हे, खुनाचे ४, जाळपोळीचे ७ आणि अपहरणाचे २ गुन्हे दाखल असून त्याच्यावर ६ लाख २५ हजार रुपयांचे बक्षीस होते.
मनिषा कुरचामी- मनिषा उर्फ बाली उर्फ गंगाबाई जगनुराम कुरचामी (३०) ही संदीपची पत्नी असून ती कसनसूर दलमची सदस्य होती. तिच्यावर चकमकीचे ९ गुन्हे, खुनाचा १ गुन्हा व जाळपोळीचे २ गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर ५ लाख २५ हजारांचे बक्षीस होते.
स्वरूपा आतला- स्वरूपा उर्फ संथिला उर्फ सरीता (२३) ही प्लाटून क्रमांक ३ मध्ये सदस्य होती. तिच्यावर चकमकीचे ६ व खुनाचे ४ गुन्हे दाखल आहेत. शासनाने तिच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
अग्नी तुलावी - अग्नी उर्फ निला मोतीराम तुलावी (२५) ही कंपनी क्रमांक ४ ची सदस्य होती. तिच्यावर चकमकीचे १४ गुन्हे, खुनाचे ५ तर जाळपोळीचे ३ गुन्हे दाखल आहेत. शासनाने तिच्यावर ५ लाखांचे बक्षीस ठेवले होते.
ममिता पल्लो- ममिता उर्फ ममता जन्ना राजू पल्लो (२०) ही कंपनी क्रमांक ४ मध्ये सदस्य होती. तिच्यावर चकमकीचे ३ गुन्हे व जाळपोळीचा १ गुन्हा दाखल आहे. तिच्यावरही ५ लाखांचे बक्षीस होते.
तुलसी कोरामी- तुलसी उर्फ मासे सन्नू कोरामी (२४) ही कंपनी क्रमांक १० मध्ये सदस्य होती. तिच्यावर ६ चकमकीचे गुन्हे दाखल असून शासनाने ५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
११ महिन्यात २८ जणांचे आत्मसमर्पण
यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर २०१९ या ११ महिन्यात २९ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण करून नक्षल चळवळीपासून फारकत घेतली. त्यात काही नक्षल नेत्यांचाही समावेश आहे. याशिवाय या काळात २१ नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून ७ नक्षलवादी पोलीस चकमकीत मारले गेले आहेत. हा नक्षल चळवळीला मोठा धक्का असून लवकरच आणखी काही नेते आत्मसमर्पण करतील, असा विश्वास डीआयजी तांबडे व पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी व्यक्त केला.
‘चळवळीत गेलो ही माझी चूकच’
नक्षल चळवळ काय आहे हे माहीत नसताना २० वर्षाच्या वयात मी नक्षल चळवळीत सहभागी झालो. ते लोक गावात येऊन गाणी सादर करायचे. त्यांचा ड्रेस, बंदुक याचे आकर्षण वाटत होते. त्यामुळे त्यांच्यासोबत गेलो, पण पुढे काय करायचे हे काहीच माहीत नव्हते. नक्षल चळवळीत जाणे चुकीचे होते हे लक्षात आल्याने आज ती चूक सुधारण्यासाठी मी आत्मसमर्पण केले, अशी भावना आत्मसमर्पित नक्षल कमांडर संदीप उर्फ महारू चमरू वड्डे याने व्यक्त केली.
गडचिरोली : कसनसूर दलमच्या कामांडरसह एकूण 6 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, एकूण 31 लाख 50 हजारांचे होते बक्षीस https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) November 27, 2019