गडचिरोलीत ऑनलाईन क्रिकेट सट्ट्याचा पर्दाफाश; १० जणांना अटक, राज्यस्तरीय रॅकेटची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 08:46 PM2021-07-31T20:46:29+5:302021-07-31T20:48:17+5:30
जिल्ह्यातील आष्टी परिसरात मोबाईलच्या माध्यमातून क्रिकेट, फुटबॉलचा ऑनलाईन सट्टा चालविणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला.
गडचिरोली/आष्टी : जिल्ह्यातील आष्टी परिसरात मोबाईलच्या माध्यमातून क्रिकेट, फुटबॉलचा ऑनलाईन सट्टा चालविणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. यात चंद्रपूर जिल्ह्यातील ३ बुकींसह एकूण १० जणांना अटक करण्यात आली. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन जुगाराच्या माध्यमातून क्रिकेटवर सट्टा चालविणारे रॅकेट गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात दि.३० ला अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर व त्यांच्या चमूने आष्टी परिसरातील छगन मठले, राजू धर्माडी, मनोज अडेटवार, द्राव्यराव चांदेकर, सुमित नगराळे आणि अहेरी-आलापल्ली परिसरातील सुरेंद्र शेळके, संदीप गुदप्पवार यांना चौकशीसाठी बोलाविले. चौकशीत हे सर्वजण ‘बेटएक्स १ डॉट को’ आणि ‘नाईस डॉट ७७७ डॉट नेट’ या बेकायदेशीर ऑनलाईन जुगार प्लॅटफाॅर्मच्या माध्यमातून क्रिकेट, फुटबॉल आणि बाबींसाठी बुकी म्हणून काम करत असल्याचे दिसून आले.
या सर्व आरोपींविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ सहकलम जुगार अधिनियम तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना चार दिवसांचा पीसीआर मिळाला आहे.
२१ लाखांची रक्कम जप्त
या आरोपींकडून २१ लाख ३३ हजार रुपयांची रोख रक्कम, तसेच सट्ट्यासाठी वापरले जाणारे मोबाईल हस्तगत करण्यात आले. या प्रकरणात मोठे राज्यस्तरीय ऑनलाईन जुगाराचे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
चंद्रपुरातील तिघे मुख्य वितरक
गडचिरोली जिल्ह्यातील बुकींकडून मिळालेल्या माहितीच्याआधारे पोलिसांना चंद्रपुरातील बुकींची माहिती मिळाली. त्यात राकेश कोंडवार, रजिक अब्लुल खान आणि महेश अल्लेवार हे चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातही बेकायदेशीरपणे ऑनलाईन सट्टा प्लॅटफाॅर्मचे मुख्य वितरक म्हणून काम करत असून, युजर आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून एजंट, ग्राहक तयार करतात, अशी माहिती समोर आली.