उजना शिवारात पाेलीस पथकाचा जुगारावर छापा; किनगावात गुन्हा
By राजकुमार जोंधळे | Published: October 9, 2022 04:15 PM2022-10-09T16:15:40+5:302022-10-09T16:16:12+5:30
सात जुगाऱ्यांना पकडले, उजना शिवारात जांभळीच्या झाडाखाली तिर्रट नावाचा ५२ पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळताना हे सात जण आढळून आले.
अंधोरी (जि. लातूर) : अहमदपूर तालुक्यातील उजना शिवारात सुरु असलेल्या तिर्रट नावाच्या जुगारावर किनगाव ठाण्यांच्या पाेलीस पथकाने ८ ऑक्टाेंबर राेजी छापा मारला. यावेळी सात जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्य एकूण २४ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत किनगाव पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील उजना, नागझरी आणि रेणापूर येथील काही जुगारी दिलावर बादशहा, काळी पान बादशाह, चौकट ताशे तीन पत्ते असा जुगार खेळत हाेते. याबाबतची माहिती पाेलिसांना खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे किनगाव येथील पाेलिसांच्या पथकाने उजना शिवारात सुरु असलेल्या जुगारावर छापा मारला. ही कारवाई शनिवार, ८ ऑक्टाेंबर राेजी केली. ताब्यात घेतलेल्या सात जुगाऱ्यांकडून पाेलिसांनी जुगाराचे साहित्य, मोबाईल, रोख रक्कम असा जवळपास २४ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उजना शिवारात जांभळीच्या झाडाखाली तिर्रट नावाचा ५२ पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळताना हे सात जण आढळून आले. अन्य काही जण उसाच्या फडाचा आधार घेत पळून गेले आहेत. याबाबत किनगाव पोलीस ठाण्यात नागनाथ कातळे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.