‘ऑनलाइन’च्या जाळ्याने आयुष्याचा ‘गेम ओव्हर’; 'तो' अखेरचा सेल्फी ठरला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 10:31 AM2023-07-14T10:31:56+5:302023-07-14T10:32:14+5:30
दांपत्याने २ मुलांना विष पाजून केली आत्महत्या
भोपाळ : ऑनलाइन कंपनीमध्ये काम करणाऱ्या तसेच सायबर भामट्यांच्या सापळ्यात अडकलेल्या एका दांपत्याने आपल्या दोन्ही मुलांना विष दिले व त्यानंतर आत्महत्या केली. डोक्यावर खूप कर्ज झाल्याने व ऑनलाइन कंपनीच्या जाळ्यात अडकल्याने आत्महत्या करत असल्याचे या दांपत्याने एका चिठ्ठीमध्ये म्हटले आहे.
शिवविहार कॉलनीमध्ये राहाणारे भूपेंद्र विश्वकर्मा (३८ वर्षे) यांना काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सॲपवर ऑनलाइन अर्धवेळ कामाचा संदेश आला. पैशांची गरज असल्याने त्यांनी त्या कंपनीत काम करायला सुरुवात केली. त्या ऑनलाइन कंपनीने मोठ्या कमाईचे आमिष दाखवून भूपेंद्र यांच्याकडून बरीच रक्कम उकळली. त्यांचा लॅपटॉप हॅक करून त्यांच्या बँक खात्यातील पैसेही काढून घेतले. तसेच, या दांपत्याची मॉर्फिंग केलेली अश्लील छायाचित्रे सोशल मीडियावर झळकविली. भूपेंद्र यांच्याकडे सायबर भामट्यांनी १७ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यामुळे त्रासलेले भूपेंद्र व त्यांची पत्नी रितू (३५ वर्षे) यांनी आपल्या ऋतुराज (३ वर्षे), ऋषिराज (५ वर्षे) या दोन मुलांना कोल्ड्रिंकमध्ये विष मिसळून ते पाजले. मुले गतप्राण झाल्याची खात्री केल्यानंतर पती-पत्नीने दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केली.
मित्राच्या ४० हजारांच्या कर्जापायी...
ऑनलाइन कंपनीकडून घेतलेले कर्ज फेडता न आल्याने व या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून मानसिक छळ सुरू झाल्याने कातावलेल्या तेजस या विद्यार्थ्याने बंगळुरू येथे आत्महत्या केली. तो इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. मित्रासाठी तेजसने वर्षभरापूर्वी ४० हजार रुपयांचे कर्ज एका ऑनलाइन कंपनीकडून घेतले होते. पण, तो कर्ज फेडू शकला नव्हता. अशा स्थितीत माझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय काहीही पर्याय नाही असे तेजसने आत्महत्या करण्यापूर्वी एका चिठ्ठीत लिहून ठेवले होते.
...तो अखेरचा सेल्फी
भूपेंद्र यांच्या घरात विषारी द्रव्याची सहा पाकिटे आढळून आली. आत्महत्येपूर्वी त्यांनी गुरुवारी पहाटे ४ वाजता पुतणी रिंकी विश्वकर्मा हिला व्हॉट्सॲपवर पत्नी व दोन मुलांबरोबर काढलेला एक सेल्फी पाठविला. त्या चित्राखाली भूपेंद्र यांनी लिहिले की, हे आमचे अखेरचे छायाचित्र आहे.