गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ, अटकेची टांगती तलवार कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 05:39 PM2022-04-21T17:39:49+5:302022-04-21T18:50:25+5:30
Ganesh Naik Case : आज सुनावणी दरम्यान बंदूक दाखवणं हा खूप मोठा गुन्हा यावर अंतरिम जामीन मिळू नये अशी मागणी फिर्यादी महिलेच्या वकिलांनी केली.
ठाणे : ऐरोलीचे भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी त्यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेला रिव्हॉल्व्हर दाखवून धमकाविल्याबाबत तपास अधिकाऱ्याचा जबाब जाणून घेतल्यानंतरच येत्या २७ एप्रिल रोजी सुनावणी घेण्याचा निर्णय ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी गुरुवारी दिला. नाईक यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाबाबतची सुनावणी शुक्रवारीच होणार असल्याचीही माहिती आहे.
नाईक यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेने तब्बल २७ वर्षांनी बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत नेरूळ पोलीस ठाण्यात कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल आहे. रिव्हॉल्व्हर दाखवून धमकाविल्याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यातही नाईक यांच्याविरुद्ध याच महिलेने एक आठवड्यापूर्वी स्वतंत्र गुन्हा दाखल केला. अनेकदा आपल्या इच्छेविरोधात शरीरसंबंध ठेवल्याचे या महिलेने तक्रारीमध्ये म्हटले आहे. नवी मुंबईतील नेरूळ पोलिसांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून, या महिलेची वैद्यकीय चाचणी केली. नाईक यांनी ठाणेन्यायालयात गुरुवारी अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला. सुरुवातीला जिल्हा तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी या अर्जावर सुनावणीला नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण न्या. गुप्ता यांच्या न्यायालयात आले. या न्यायालयानेही केवळ रिव्हॉल्व्हरने धमकी दिल्याप्रकरणी सुनावणी केली. सरकारी वकील आणि तपास अधिकारी यांचा जबाब नोंदविल्यावर पुढील निर्णय दिला जाईल. मात्र, त्यांना अंतरिम जामीन दिला नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे तूर्तास या दोन्ही प्रकरणांमध्ये नाईक यांच्यावरील अटकेची तलवार कायम आहे.
बंदूक दाखविणे हा खूप मोठा गुन्हा आहे, त्यामुळे यावर अंतरिम जमीन मिळू नये, अशी मागणी पीडितेच्या वकिलांनी न्यायालयात केली. त्यावर १९९३ पासून पीडिता आणि नाईक यांचे संबंध होते. २००४ ला अपत्य झाले. परंतु, गेल्या दोन वर्षांपूर्वी नाईक यांनी राजकीय पक्ष बदलला. त्यामुळे त्यांच्यावर हे आरोप होत आहेत, असा दावा नाईक यांच्या वकिलांनी केला. मात्र, राजकीय पक्षांशी या आरोपांचा संबंध नसून, तब्बल २७ वर्षे पीडितेने अन्याय सहन केल्याचे तिच्या वकिलांनी न्यायालयात तसेच प्रसार माध्यमांना सांगितले. दरम्यान, दोन वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर नाईक हे भूमिगत झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.