विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरणारी मालेगावची ११ जणांची टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:47 PM2018-09-25T22:47:59+5:302018-09-25T22:48:15+5:30
विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरण्यासाठी मालेगावहून दोन गाड्या करुन आलेल्या टोळीतील ११ जणांना गुन्हे शाखेच्या युनिट २ ने अटक केली असून त्यांच्याकडून ७६ मोबाईलसह दोन गाड्या असा १६ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पुणे : विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरण्यासाठी मालेगावहून दोन गाड्या करुन आलेल्या टोळीतील ११ जणांना गुन्हे शाखेच्या युनिट २ ने अटक केली असून त्यांच्याकडून ७६ मोबाईलसह दोन गाड्या असा १६ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्यांना २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
उबेदुर रहिमन महंमद दिलदार (वय १९), मुस्ताक अहमद महंमद इब्राहिम (वय ३५), फिरोज इक्बाल शाह (वय ४०) आणि जाकिर हुसेन महंमद एहसान (वय ४०, सर्वजण, रा. मालेगाव जि. नाशिक), अकबरखान हबीब खान (वय ३०), अफसरखान हबीब खान (वय २६), महंमद शहजाद महम्मंद सुलेमान (वय १९) आणि मोहम्मद शाबान मुर्तजा (वय ४०, रा. मालेगाव, जि. नाशिक) अशी अटक केलेल्या आठ जणांची नावे आहेत.
विसर्जन मिरवणुकीत रविवारी रात्री युनिट २ चे पथक गस्त घालत असताना कुंभारवाडा चौकात दोन संशयित थांबल्याचे या पथकाच्या लक्षात आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांच्याकडे ५ मोबाईल सापडले़ त्यांनी गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरल्याची कबुली दिली़ अधिक चौकशीत आणखी ८ ते १० जण आपल्याबरोबर आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन मालधक्का येथून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४ मोबाईल जप्त करण्यात आले़ विसर्जन मार्गावर गस्त घालून आणखी ६ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १५ मोबाईल जप्त केले गेले़ मालधक्का आणि शिवाजी चौकात असलेल्या दोन्ही गाड्या ताब्यात घेण्यात आल्या़ शिवाजी चौकातून दोघांकडून गाडीसह ४ मोबाईल ताब्यात घेतले. त्यांचे दोन साथीदार मालेगावला गेल्याचे समजल्यावर एक पथक तातडीने मालेगावला रवाना झाले व त्यातून दोघांना ताब्यात घेण्यात आले़.
या कारवाईत आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ७६ मोबाईल व २ मोटारी असा १६ लाख ३५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे़ त्यांच्याविरुद्ध फरासखान्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट २चे पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहायक निरीक्षक जयवंत जाधव, सहायक फौजदार शेखर कोळी, हवालदार दिनेश गडांकुश, अस्लम पठाण, राजू केदारी, किरण पवार, अजय खराडे, पोलीस नाईक किशोर वग्गू, अतुल गायकवाड, विशाल भिलारे, प्रसाद जंगीलवाड, अजित फरांदे, चंद्रकांत महाजन, गणेश नरुटे यांच्या पथकाने केली आहे.