नागपुरात नेता चालवित होता दारू तस्करांची टोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:09 PM2020-01-15T23:09:18+5:302020-01-15T23:10:09+5:30
नेत्याच्या इशाऱ्यावर संचालित होत असलेली दारू तस्करांची टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. बजाजनगर पोलिसांनी या टोळीच्या दोघांना अटक केली आहे. नेता आणि दारूचा पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांचा शोध सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नेत्याच्या इशाऱ्यावर संचालित होत असलेली दारू तस्करांची टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. बजाजनगर पोलिसांनी या टोळीच्या दोघांना अटक केली आहे. नेता आणि दारूचा पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांचा शोध सुरु आहे.
अटक केलेल्या आरोपीत महेश भोजराज इखार (४३) रा. साईबाबानगर आणि राहुल टिकारामसिंह बैस (२६) रा. त्रिमूर्तीनगर यांचा समावेश आहे. त्यांचा प्रमुख समित रहांगडाले फरार आहे. महेश ऑटोचालक आहे, तर राहुल पोओपीचे काम करतो. ते अमित रहांगडालेच्या इशाऱ्यावर दारूची तस्करी करतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित एका राष्ट्रीय पार्टीच्या युवा शाखेचा पदाधिकारी आहे. त्याच्या इशाऱ्यावर दोघेही दारूची तस्करी करीत होते. ते ऑटोत दारू भरून वर्धा मार्गावर घेऊन जातात. तेथून अमित रहांगडाले ही दारू बाहेर रवाना करतो. अनेक दिवसांपासून हे काम सुरु आहे. त्याची पोलिसांना माहिती मिळाली. बजाजनगर पोलिसांनी सावरकरनगर चौकाजवळ महेशच्या सहा सिटर ऑटोला थांबविले. त्यात राहुलही होता. ऑटोची तपासणी केली असता त्यात दारूच्या पेट्या होत्या. त्यांची किंमत ७२ हजार रुपये होती. पोलिसांनी चौकशी केली असता दोघांनीही अमित रहांगडालेच्या इशाºयावर रजत वाईन शॉपमधून दारूच्या पेट्या आणल्याचे सांगितले. पोलिसांनी दारू आणि ऑटो जप्त केला आहे. रजत वाईन शॉप अत्रे ले-आऊटमध्ये आहे. त्याचा मालक राजू प्यारेलाल जायसवाल असून तो प्रभावशाली आहे. अमितही राष्ट्रीय पार्टीचा शहर युवा पदाधिकारी आहे. यामुळे कारवाईची माहिती मिळताच नेता सक्रिय झाले. त्यांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी आरोपींना जमानतीवर सोडण्यास सांगितले. बजाजनगर पोलिसांनी नेत्यांचे ऐकले नाही. त्यांनी आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलीस दारू व्यावसायिक राजू जायसवाल आणि त्याचे दुकान चालविणाऱ्यांचा तपास करीत आहेत. त्यानंतर दोघांची भूमिका ठरविण्यात येणार आहे. सूत्रांनुसार राष्ट्रीय पार्टीचा पदाधिकारी असल्यामुळे अमित रहांगडालेवर कारवाई करण्यास पोलीस मागेपुढे पाहत आहेत. त्याचे मोठ्या व्यक्तींसोबत संबंध असल्याची माहिती आहे. त्यामुळे बजाजनगर पोलिसांनी योजना आखून ही कारवाई केली. ही कारवाई ठाणेदार राघवेंद्रसिंह क्षीरसागर, हवालदार संजय सिंह ठाकुर, विनोद द्विवेदी, संजू भूषणम, अनिल टिक्कस यांनी पार पाडली.