पिंपरीत गोडावून फोडून कुलर चोरणारी टोळी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 07:30 PM2019-05-21T19:30:14+5:302019-05-21T19:33:36+5:30
गोडाऊन फोडून कुलरची चोरी करणारया टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पिंपरी : गोडाऊन फोडून कुलरची चोरी करणारया टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. चोरट्यांकडून ८६ कुलर हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. योगेश बाबाजी पुतमाळी (वय २३, रा. पाण्याच्या टाकीजवळ, मिठमिठाजवळ, माळीवाडी. ता. व जि. औरंगाबाद), अजिज बादशहा सय्यद (वय ४८, रा. भारतनगर, वाळुजगाव, ता. गंगापुर, जि. औरंगाबाद), ज्ञानेश्वर रामराम पल्हाळ (वय २३, रा. पवननगर रांजनगाव, ता. गंगापुर, जि. औरंगाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ताथवडे येथील रघुनंदन कार्यालयामागे डीजीवन स्रेहांजली रिटेल प्रा.लि. या कंपनीचे गोडाऊन आहे. ७ मे रोजी या गोडाऊनचे शटर उचकटून आत शिरलेल्या चोरट्यांनी सिंंफनी कंपनीचे ९० कुलर व फेबर कंपनीची एक स्वयंपाक एक्झॉस्ट चिमणी हा माल चोरुन नेला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याचा तपास सुरु असताना ही चोरी औरंगाबाद येथील वाळुंज परिसरात राहणाऱ्या चोरट्यांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना शनिवारी त्याब्यात घेतले. त्यांच्याकडून ८६ कुलर व स्वयंपाक एक्झॉस्ट चिमणी यासह गुन्ह्यात वापरलेला टेम्पो असा दहा लाख रुपयांचा माल जप्त केला. अटक आरोपींपैकी दोन आरोपींवर लोणीकंद पोलीस ठाण्यात व औरंगाबाद येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगवेगळया कंपनीचे गोडावून फोडीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई वरिष्ठ निरिक्षक सतिश माने, निरिक्षक ज्ञानेश्वर साबळे, उपनिरिक्षक हरिष माने, सिद्धनाथ बाबर, कर्मचारी बापूसाहेब धुमाळ, बिभीषन कन्हेरकर, नितीन ढोरजे, जावेद पठाण, विक्रम जगदाळे, भैरोबा यादव, विक्रम कुदळ, प्रमोद निकम, विजय गंभीरे, दिपक भोसले यांच्या पथकाने केली.