दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीस अटक; शस्त्र जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 09:29 PM2019-09-02T21:29:02+5:302019-09-02T21:31:22+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
यवतमाळ - घातक शस्त्रे बाळगून दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री शहरातील गोधणी रोड परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली असून आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सण आणि उत्सवाची शहरात धामधूम असताना कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी करून सऱ्हाईत गुन्हेगारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर हे त्यांच्या पथकासह एम.एच.29 - एम.9565 या वाहनाने यवतमाळ शहर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. या दरम्यान, त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून काही संशयीत इसम गोधणी रोडवरील जसमीत अपार्टमेंटसमोर तोंडाला रुमाल व गमछे बांधून हातात रॉडसारख्या वस्तू घेऊन संशयास्पद स्थितीत बसलेले आहेत. या माहितीची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन पोलीस उपनिरीक्षक भोयर यांनी पंच व इतर स्टाफ सोबत घेऊन या घटनास्थळावर छापा मारला.
यावेळी आरोपी राजू किसन वाघाडे (वय 35), रा. पाटीपुरा, फुकट नगर, यवतमाळ, कृष्ण उर्फ कान्हा मारोती घोसळकर (वय 28), रा. सिंघानिया नगर, यवतमाळ, समीर उर्फ टुप्पी घनश्याम कुसराम (वय 29), रा. सिंघानिया नगर, यवतमाळ, रुपेश उर्फ टावर बाबाराव गजलवार (वय 38), रा. निखील नगर, उमरसरा यवतमाळ आणि सुरज उर्फ लहाण्या गजानन मोहोड (वय 34), रा. मोठे वडगाव, यवतमाळ यांना ताब्यात घेतले. यावेळी सदर आरोपींकडून पोलिसांनी तोंडाला बांधून असलेले गमछे, दोन चाकू, एक खंजर, एक लोखंडी रॉड, एक बांबू काठी, नायलॉन दोरी, मिरची पावडर व एक छ-याची गन असे साहित्य जप्त केले.
वरील सर्व आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूचे असल्याचे लक्षात आल्याने व ते दरोडा टाकण्याच्या उद्देशाने पूर्व तयारीत असताना मिळून आल्याने त्यांच्याविरुध्द अवधूतवाडी पोलीस स्टेशलना कलम 399 भा. दं. वि., सह कलम 4/25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. या कारवाई पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक नरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर, सहाय्यक फौजदार ओमप्रकाश यादव, पोलीस हवालदार गजानन धात्रक, बंडू डांगे, पोलीस नाईक गजानन डोंगरे, किरण पडघण, हरीश राऊत, पोलिस कॉन्स्टेबल सुधीर पिदुरकर, महेश पांडे, गजानन हरणे, सुरेंद्र वाकोडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पार पाडली.