पुण्यात एटीएम फोडण्याच्या तयारीने आलेली टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 03:16 PM2019-01-30T15:16:53+5:302019-01-30T15:18:38+5:30
लक्ष्मी नारायण चित्रपटगृहाजवळील एटीएम फोडण्याच्या तयारीत असलेल्या ७ जणांच्या टोळीला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे़.
पुणे : लक्ष्मी नारायण चित्रपटगृहाजवळील एटीएम फोडण्याच्या तयारीत असलेल्या ७ जणांच्या टोळीला दत्तवाडी पोलिसांनीअटक केली आहे़. सुमित ऊर्फ नव्या भरत दिघे (वय १९, रा़ पर्वती दर्शन), महेश ऊर्फ मिठ्या राजेंद्र नवले (वय २१), सौरी सुनिल येणपुरे (वय २२), धनंजय नारायण अडागळे (वय १८, रा़ पदमावती), प्रसाद जनार्धन मुसळे (वय २१, रा़ पर्वती दर्शन) अमर लक्ष्मण गायकवाड (वय २०, रा़ जनता वसाहत) आणि यश रामदास उकरंडे (वय १८, रा़ धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. यातील ५ जणांवर यापूर्वी मारामारी व चोरीचे गुन्हे स्वारगेट, दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहे़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, लक्ष्मी नारायण चित्रपटगृहाजवळील बोळात हे सर्व जण हत्यारे घेऊन थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़. पोलिसांनी त्यांना चारही बाजूने घेरुन पकडले़ त्यांच्याकडील बॅगेत चार कोयते, एक कटावणी, रस्सी, लोखंडी रॉड, मिरची पावडर असा माल मिळाला़. आश्रय हॉटेलजवळील बँक ऑफ इंडियाचे एटीएमवर दरोडा टाकून ते फोडून लुटण्याचा त्यांचा बेत होता़. पोलीस उपनिरीक्षक ए़ जी़ डफळ अधिक तपास करत आहेत.