कर्जाद्वारे बँकांना गंडा घालणारी पाच जणांची टोळी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 07:05 AM2018-09-30T07:05:21+5:302018-09-30T07:05:39+5:30
रोमी कपूर हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून बॅँकेत एंजट म्हणून काम करणारा तिवारी त्याला माहिती पुरवत होता, या टोळीकडून फसवणुकीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
मुंबई : बनावट कागदपत्रे, दस्तऐवज बँकेत सादर करून कर्ज घेत, त्यांची परतफेड न करता बँकेला गंडा घालणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा शनिवारी पोलिसांनी पर्दाफाश केला. रोमी कपूर उर्फ कौशिककुमार कौस्तुभ नाथ (४१), साकेत दीक्षित (३४), विशाल तिवारी (४१), जिग्नेश रजनी (३१) आणि विकास डोंगरे (३४) अशी त्यांची नावे असून त्या सर्वांना ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
रोमी कपूर हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून बॅँकेत एंजट म्हणून काम करणारा तिवारी त्याला माहिती पुरवत होता, या टोळीकडून फसवणुकीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त अकबर पठाण यांनी व्यक्त केली. अटक केलेल्यांपैकी तिवारी हा बँकेचा दलाल आहे. तो कर्ज काढून देण्याचे काम करतो, तर उर्वरित तिघांनी बनावट कागदपत्रे नाथला देऊन बँकेकडून गृहकर्ज, वाहन कर्ज, खासगी कर्ज काढत पैसे उकळले.
मांडवी बँकेकडून वाहन कर्ज घेण्यासाठी रजनी आणि डोंगरे यांनी त्यांच्या बंद असलेल्या एस.एस. मोटर्स कंपनीची बनावट कागदपत्रे नाथ याला बनवून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नाथने ठाण्यात गाळा घेतल्याचे दाखवत मांडवी बँकेतून ५९ लाख आणि बँक आॅफ इंडियामधून ७ लाख रुपयांचे खासगी कर्ज काढले. तर इंडियन बँकेतून तिवारी आणि दीक्षित यांनी अनुक्रमे २९ आणि २१ लाखांचे वाहनकर्ज काढले. मात्र त्या कर्जाची परतफेडच केली नाही.
गेल्या सप्टेंबर महिन्यापासून हे पाच जण बँकांना चुना लावत होते. ही माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष-११चे प्रभारी चिमाजी आढाव यांना मिळाली. या प्रकाराची दखल घेत रोमी कपूर हे बनावट नाव धारण केलेल्या नाथला आढाव यांच्या पथकाने सर्वात आधी ताब्यात घेतले. नाथच्या झडतीत पोलिसांना प्रत्येकी दोन पॅनकार्ड, आधारकार्ड, वाहनचालक परवाना आणि अन्य कागदपत्रे सापडली. या सर्वांवर एकाच व्यक्तीचा फोटो लावून राजन कपूर आणि कौशिक नाथ या दोन नावांनी ती तयार करण्यात आली होती. यासाठी त्याने बँक दलाल तिवारी याची मदत घेतल्याचे उघड झाले. ओशिवरा पोलीस ठाण्यात या फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास चिमाजी आढाव यांचे पथक करत होते. तिवारी आणि नाथकडून मिळालेल्या माहितीवरून अन्य तीन साथीदारांचा गाशादेखील त्यांनी गुंडाळला. या टोळीने जे कर्ज विविध बँकेतून काढले ते आपापसात वाटून घेतल्याची कबुली पोलिसांना दिली.
नाथवर कोलकातामध्येही गुन्हा!
नाथ हा उच्चशिक्षित असून त्याच्यावर कोलकातामध्ये देखील अशाच
प्रकारे कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. तिवारी वगळता सर्व पदवीधर असून त्यांची पार्श्वभूमी पोलीस तपासत आहेत. झटपट पैसा कमवून उच्चभ्रू आयुष्य जगण्याच्या लालसेपोटी त्यांनी हा गुन्हा केल्याचे उघड झाले. त्यांनी अशा प्रकारे अजून काही बँकांची फसवणूक केली असल्याचा संशय पोलिसांना असून बँकांनी पुढाकार घेत तक्रार करावी, असे आवाहन उपायुक्त पठाण यांनी केले आहे.