‘त्या’ टोळीने चार महिन्यांपूर्वी थाटले होते पनवेलच्या लॉजमध्ये कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 12:09 AM2021-03-04T00:09:08+5:302021-03-04T00:09:13+5:30

बीएस ४ गाड्यांचे विक्री प्रकरण 

The gang had set up an office in a lodge in Panvel four months ago | ‘त्या’ टोळीने चार महिन्यांपूर्वी थाटले होते पनवेलच्या लॉजमध्ये कार्यालय

‘त्या’ टोळीने चार महिन्यांपूर्वी थाटले होते पनवेलच्या लॉजमध्ये कार्यालय

Next

- सूर्यकांत वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : केंद्राने बंदी घातलेल्या बीएस ४ इंजिन गाड्यांच्या विक्री प्रकरणी अटक केलेल्या टोळीने चार महिन्यांपासून पनवेलच्या लॉजमध्येच कार्यालय थाटले होते. त्याठिकाणी रोज देशभरातून शेकडो खरेदीदारांची रांग लागत होती. अखेर गुन्हे शाखा पथकाला त्याची चाहूल लागताच कारवाई करून हे रॅकेट उघड झाले.


पनवेलच्या शिरढोण येथील बालाजी लॉजमधून देशभरात गाड्या विक्रीचे रॅकेट चालवले जात होते. मारुती कंपनीने बीएस ४ इंजिनच्या गाड्या भंगारात काढल्यानंतर आनम सिद्धिकीने १४ कोटीला सुमारे ५०७ गाड्या विकत घेतल्या होत्या. त्यात १०० गाड्या बीएस ६ इंजिनच्या होत्या. मात्र बीएस ४ इंजिनच्या गाड्या वापरात आणून त्यापासून मोठा नफा कमविण्याची शक्कल सिद्धिकीने लढवली. याकरिता खरेदी केलेल्या गाड्या बालाजी लॉजच्या आवारात ठेवून तिथल्या सहा खोल्या दीर्घकाळासाठी भाड्याने घेतल्या. त्यानुसार गेल्या चार महिन्यांपासून त्याठिकाणी तो आपल्या सहकाऱ्यांसह मुक्कामी होता. यामुळे लॉजचालकही पोलिसांच्या रडारवर आला आहे. तेथे स्वस्तात मिळणाऱ्या गाड्या पाहून खरेदी करण्यासाठी देशभरातून रोज शंभरहून अधिक व्यक्ती भेट देत होत्या. त्यांना या गाड्या पाण्यात भिजल्याने कमी किमतीत विकत असल्याचे सांगितले जात होते.

दरम्यान, या गाड्यांची विक्री झाल्यास त्यावर चेसी नंबर टाकून दिला जात होता. मारुती कंपनीने गाड्या भंगारात काढताना त्यावरील चेसी नंबरचा भाग कापला होता. मात्र आनमने गुजरातमधील हिम्मतनगर येथील गॅरेजचालक इमरान चोपडाशी संपर्क साधून औरंगाबाद येथून गाड्यांचे चेसी नंबर छापणारी सव्वा लाखाची मशीन खरेदी केली. ती इमरानच्या गॅरेजवर ठेवून तिथे पाहिजे असलेल्या गाडीची चेसी नंबर छापून पनवेलला पाठवली जायची. त्यानंतर गाडीची बनावट कागदपत्रे तयार करून संबंधित ठिकाणच्या आरटीओमध्ये नोंदणी करून दिली जात होती. यासाठी टोळीने काही माणसे नेमली होती. त्यांनी अरुणाचल व हिमाचल येथे काही गाड्यांची नोंदणी केली, तर उर्वरित गाड्या मध्य प्रदेश, दिल्ली, पुणे, राजस्थान येथील आरटीओकडे नोंदणीच्या प्रक्रियेत होत्या, असे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी सांगितले. 

४० गाड्यांचा 
संच विक्रीला

आनमने गाड्या विक्रीसाठी एजंट नेमले होते. त्यांना सव्वा ते दीड कोटीला ४० गाड्यांचा संच विक्रीसाठी देण्यात आला होता. त्यानुसार अधिकाधिक नफा कमाविण्याच्या उद्देशाने गाड्यांची किंमत ठरवून त्या विकण्यात आल्या होत्या.

सव्वा महिना 
चालला तपास

गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने २८ जानेवारीला पनवेल येथे छापा टाकण्यापूर्वी काही दिवस अगोदर तिथल्या हालचालीवर लक्ष ठेवले होते. त्यानंतर कारवाईपासून ते अद्यापपर्यंत या गुन्ह्यात नऊ जणांना अटक करून देशभरातून १५१ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत, तर अद्यापही १००हून अधिक गाड्या पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

Web Title: The gang had set up an office in a lodge in Panvel four months ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.