रुपीनगरमधील अपहृत तरुणाचा टोळक्याने केला निर्घृण खून; दोन आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 12:27 PM2020-12-14T12:27:56+5:302020-12-14T12:29:00+5:30
मावळ तालुक्यातील बेबडओव्हळ पुलावरून पवना नदीत टाकला होता मृतदेह
पिंपरी : दहा ते अकरा जणांच्या टोळक्याने शुक्रवारी (दि. ११) रुपीनगर, तळवडे येथील तरुणाचे अपहरण केले होते. त्यानंतर सळई, बांबू आणि दगडाने मारून तरुणाचा खून केला. मावळ तालुक्यातील बेबडओव्हळ पुलावरून पवना नदीत तरुणाचा मृतदेह टाकून दिला. रविवारी (दि. १३) दुपारी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
सचिन उर्फ अंड्या लक्ष्मण चौधरी (वय २२, रा. रुपीनगर, तळवडे) असे खून झालेल्या अपहृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या अपहरणप्रकरणी त्याचे वडील लक्ष्मण हुकमाराम चौधरी (वय ४७, रा. रुपीनगर, तळवडे, मूळ रा. पुराबडी, राजस्थान) यांनी चिखली पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. १२) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी योगेश दिनेश सावंत (वय २२, रा. रुपीनगर), आकाश उर्फ गुंड्या प्रकाश भालेराव (रा. चिंचेचा मळा, टॉवर लाईन रोड, तळवडे), रुपेश प्रकाश आखाडे (वय २३, रा. त्रिवेणीनगर) आणि अन्य सात ते आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तसेच याप्रकरणी सनी उर्फ नकुल कुचेकर (वय २५, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) आणि गौरव रमेश डांगले (वय २२, रा. चिंचवडगाव), असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.
फिर्यादी यांचा मुलगा सचिन रात्री घरी झोपला असताना आरोपी हे फिर्यादी यांच्या घरी आले. त्यांनी सचिन याला जबरदस्तीने नेले. त्यामुळे फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चाैकशी केली असता, सचिन याचा खून करून बेबड ओव्हळ पुलावरून पवनानदीत मृतदेह टाकून दिल्याचे आरोपीने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पवना नदीतून मृतदेह शोधून काढला.
अपहृत मयत सचिन हा आरोपी योगेश याच्याकडे काम करीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कामातील व्यवहाराच्या पैशांवरून वादविवाद झाले. त्यामुळे सचिन हा इतर मुलांसोबत वावरत होता. यातून राग आल्याने आरोपी यांनी सचिन याचे अपहरण करून खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
मयत तरुण, आरोपी रेकाॅर्डवरील गुन्हेगार
फिर्यादी यांचा मयत मुलगा सचिन चाैधरी आणि आरोपी योगेश सावंत, आकाश भालेराव यांच्यावर निगडी पोलीस ठाण्यात तसेच आरोपी रुपेश आखाडे याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.