वाईतील चार जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार
By दत्ता यादव | Published: March 11, 2024 08:25 PM2024-03-11T20:25:22+5:302024-03-11T20:25:37+5:30
सातारा : वाई पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असलेल्या चार जणांच्या टोळीला पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यातून दोन ...
सातारा : वाई पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असलेल्या चार जणांच्या टोळीला पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले. अक्षय गोरख माळी (वय २१), सनी उर्फ राहुल सुरेश जाधव (२५), सारंग ज्ञानेश्वर माने (२४), वसंत ताराचंद घाडगे (१९, सर्व रा. गुरेबाजार झोपडपट्टी, वाई), अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरील चौघांवर गर्दी मारामारी करून खुनाचा प्रयत्न करणे, घरफोडी, चोरी करणे, शिवीगाळ, दमदाटी करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या गुन्ह्यांत चौघांनाही बऱ्याचवेळा अटकही झाली. मात्र, जामिनावर कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा त्यांच्या हातून गुन्हे घडत होते. त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्यामुळे वाई तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता. या टोळीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून केली जात होती. त्यामुळे वाई पोलिस ठाण्यातील प्रभारी पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी या चाैघांचा हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठविला.
या प्रस्तावावर सुनावणी होऊन अधीक्षक शेख यांनी चौघांनाही सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले. हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलिस अधीक्षक ऑंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस उपनिरीक्षक तानाजी माने, हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, केतन शिंदे, अनुराधा चव्हाण यांनी योग्य पुरावे सादर केले.