सराईत चोरट्यांची टोळी नाया नगर पोलिसांनी पकडली ; ६ गुन्हे उघडकीस
By धीरज परब | Published: July 25, 2022 08:42 PM2022-07-25T20:42:02+5:302022-07-25T20:42:47+5:30
Crime News : मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाणे हद्दीत २१ ते २२ जुलै ह्या दोन दिवसात ४ दुचाकी व १ जबरी चोरीचे गुन्हे घडल्याने खळबळ उडाली होती.
मीरारोड - मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी दुचाकी . मोबाईल चोरण्यासह जबरी चोरी करणाऱ्या ३ जणांच्या टोळीला अटक केली असून त्यांच्या कडून ४ दुचाकी जप्त केल्या आहेत . तर सदर टोळीने केलेले ६ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.
मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाणे हद्दीत २१ ते २२ जुलै ह्या दोन दिवसात ४ दुचाकी व १ जबरी चोरीचे गुन्हे घडल्याने खळबळ उडाली होती. पोलीस उपायुक्त अमित काळे व सहायक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सहायक निरीक्षक प्रणय काटे व पराग भाट यांच्या अधिपत्या खाली हापसे, गुरव, बागवान, विकास यादव, वारके, कांबळे व खामगळ यांची २ स्वतंत्र पथके नेमली होती.
अश्या प्रकारे चोऱ्या करणाऱ्या आरोपींचा मागोवा घेतानाच दुसरीकडे गुन्हे घडलेल्या परिसरातील तांत्रिक पुरावे , सीसीटीव्ही तसेच खबऱ्यां मार्फत माहिती गोळा करत तपास चालवला होता . पोलीस पथके तपास करत असताना चोरीच्या गुन्ह्यातील एक दुचाकी भाईंदर पश्चिमेच्या भोला नगर झोपडपट्टी भागात आढळून आली . पोलिसांनी सापळा रचला असता ती चोरीची दुचाकी घेण्यासाठी ३ जण आले . परंतु पोलिसांच्या सापळ्याची चाहूल लागल्याने ती पळून जाऊ लागले असताना त्यांना पकडण्यात आले .
पकडण्यात आलेल्या ३ आरोपींपैकी १ विधीसंघर्षग्रस्त बालक आहे . त्यांच्या कडे कसून तपास केल्यावर त्यांनी नयानगर पोलीस ठाणे हद्दीतून ४ दुचाकी चोरल्याचे व १ जबरी चोरी केल्याचे तसेच भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाणे हद्दी १ मोबाईल चोरल्याची कबुली दिली आहे . आरोपीं कडून चोरलेल्या ४ दुचाकी व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आल्या असून ६ गुन्हे त्यांनी केल्याचे उघड झाले आहे .