सराईत गुन्हेगारच्या टोळीला केले तीन जिल्ह्यातून हद्दपार, लातूर पोलिसाचा गुन्हेगारांना दणका
By राजकुमार जोंधळे | Published: October 18, 2023 08:48 PM2023-10-18T20:48:37+5:302023-10-18T20:49:27+5:30
औसा तालुक्यात अवैध दारूविक्री करणाऱ्या टोळीला धक्का
राजकुमार जोंधळे, लातूर: औसा तालुक्यात अवैध दारूविक्री करणारी सराईत गुन्हेगाराच्या टोळीला लातूरसह सोलापूर, धाराशिव या तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी बुधवारी जारी केले आहेत. लातूर जिल्ह्यातील भाईगिरी, गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नागरिकांना त्रास देत वेठीस धरणाऱ्या, नागरिकांच्या जीविताला आणि त्यांच्या मालमत्तेला धोका निर्माण करणाऱ्या गुंडांच्या टोळीला अद्दल घडविणयासाठी पोलिस अधीक्षक मुंडे यांनी आजपर्यंत हद्दपारीच्या एकूण चार प्रकरणात १२ सराईत गुन्हेगारांविरोधात करवाई केली असून, त्यांना लातूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
औसा तालुक्यातील भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अवैध दारू विक्रीचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई बुधवारी करण्यात आली आहे. भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अवैध दारू विक्रीचे गुन्हे करणाऱ्या दोन गुन्हेगारांना एक वर्षासाठी लातूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
टोळीतील गुन्हेगारांवर सहा गंभीर गुन्हे दाखल
या गुन्हेगारांच्या टोळीचे रेकॉर्ड पाहता भादा पोलिस ठाण्यात सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुध्द फौजदारीपात्र अपराध करणे, दुखापत, हमला करण्याची पूर्वतयारी करून अवैध दारू विक्री करणे, दुखापत करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने कारवाया आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. टोळी प्रमुख संदीप दिलीप गरड (वय ३५), प्रवीण दिलीप गरड, (वय २२, दोघेही रा. बिरवली ता. औसा जि. लातूर) याच्याविरुद्ध हद्दपारिचे आदेश जारी केले आहेत.
लातूरसह तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी टोळी हद्दपार...
औसा तालुक्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील दोघांना लातूर, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.हा प्रस्ताव तयार करण्यासाठी औसा उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, अंमलदार प्रदीप स्वामी, भादाचे सपोनि. डोंगरे, अमलदार देशमुख, फड यांनी पुढाकार घेतला.