चैनीसाठी चोऱ्या करणारी तरुणांची टोळी जेरबंद, चार गुन्ह्यांची उकल
By उद्धव गोडसे | Published: May 15, 2023 10:01 PM2023-05-15T22:01:59+5:302023-05-15T22:02:11+5:30
चार कृषिपंपांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
उद्धव गोडसे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : चैनी करण्यासाठी पैसे मिळवण्याच्या उद्देशाने कृषीपंप आणि दुचाकींची चोरी करणारी सहा जणांची टोळी करवीर पोलिसांनी रविवारी (दि. १४) जेरबंद केली. म्हालसवडे (ता. करवीर) येथील या टोळीकडून पोलिसांनी चार कृषीपंप, दोन दुचाकी आणि चोरीसाठी वापरलेली बोलेरो कार असा तीन लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
राहुल अर्जुन पाटील (वय ३१), ऋषिकेश लक्ष्मण पाटील (वय २४), विनायक मारुती पाटील (वय ३४), दीपक भिवाजी निकम (वय २३), गणेश पांडुरंग पाटील (वय २५), आणि सम्राट सरदार पाटील (वय २४, सर्व रा. म्हालसवडे, ता. करवीर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. त्यांना मंगळवारपर्यंत (दि. १६) पोलिस कोठडी मिळाली.
करवीरचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात दाखल झालेल्या कृषीपंप चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना म्हालसवडे ते भाटणवाडी रोडवर काही चोरटे कारमधून येणार असल्याचे समजले होते. त्यानुसार रविवारी दुपारी सापळा रचून संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत म्हालसवडे, सडोली दुमाला आणि घुंगूरवाडी येथील चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला.
चैनी करण्यासाठी पैसे मिळावेत, यासाठी चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली. जप्त केलेल्या दुचाकींच्या मालकांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे, पोलिस अंमलदार विजय तळसकर, सुजय दावणे, सुभाष सरवडेकर, प्रशांत पाटील, श्रीधर जाधव, योगेश शिंदे, फिरोज मुल्ला, अमोल चव्हाण, रणजित देसाई, विजय पाटील आदींनी ही कारवाई केली.