महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 07:33 PM2021-05-20T19:33:41+5:302021-05-20T19:37:58+5:30
Sex Racket : शहरातील सातव चौकस्थित प्रसाद कॉलनी येथील ओंकार अपार्टमेंटमध्ये हा प्रकार सुरू होता.
अकोला : महिला व मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या टोळीचा रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी पर्दाफाश केला. शहरातील सातव चौकस्थित प्रसाद कॉलनी येथील ओंकार अपार्टमेंटमध्ये हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी आरोपींविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १५६ कलम ३, ४(१),(२), ५(१)क,ग नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सातव चौकस्थित प्रसाद कॉलनी येथील ओंकार अपार्टमेंटमधील प्लॅट क्रमांक ६ मध्ये महिला व मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेण्यात येत असल्याची गोपनीय माहिती रामदासपेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांना गुरुवारी मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक महाजन यांच्यासह आपल्या सहकाऱ्यांसोबत ओंकार अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ६ मध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकला. याप्रसंगी अंबिकापूर येथील रहिवासी ऋषिकेश संजय मालोकार (२२) आणि दापुरा येथील रहिवासी अनंत नागोराव गावंडे (२३) हे दोन युवक पीडित महिलेसोबत आक्षेपार्ह्य स्थितीत आढळून आले. याप्रसंगी पोलिसांनी तीन मोबाइल व एक दुचाकी असा एकूण ६७ हजार २० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीदरम्यान मुख्य आरोपी विकी विजय काळे (२३), रा. रुस्तमपूर, जि. अमरावती स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी महिला व मुलींकडून वेश्या व्यवसाय चालवीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक महाजन यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपींविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.