सामूहिक बलात्कार, दोन महिन्यांनी ३ नराधम अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 01:02 PM2024-01-01T13:02:58+5:302024-01-01T13:03:50+5:30
आरोपींचे फोटो अनेक भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत असल्याने या प्रकरणात आतापर्यंत दबाव टाकण्यात आला, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
वाराणसी : वाराणसीच्या काशी हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) आयआयटी विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार आणि व्हिडीओ बनवल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी भाजपच्या आयटी सेलशी संबंधित आहेत. आरोपींचे फोटो अनेक भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत असल्याने या प्रकरणात आतापर्यंत दबाव टाकण्यात आला, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
कुणाल पांडे हा भाजप आयटी सेल वाराणसीचा महानगर संयोजक, सक्षम पटेल हा आयटी सेल वाराणसी महानगर सह-संयोजक तर आनंद उर्फ अभिषेक चौहान हा आयटी सेल वाराणसी महानगरचा कार्य समिती सदस्य आहे. रविवारी सायंकाळी वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना कडक बंदोबस्तात न्यायालयात हजर केले.
नेमके काय झाले होते?
- आयआयटीच्या एका विद्यार्थिनीने २ नोव्हेंबर रोजी लंका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ती १ नोव्हेंबर रोजी रात्री तिच्या आयआयटी वसतिगृहातून बाहेर पडली आणि तिच्या मित्रासोबत चालत असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडवले.
- आरोपींनी तिच्या मित्राला प्रथम मारहाण केली त्यानंतर तिचे तोंड दाबून एका कोपऱ्यात नेऊन विवस्त्र करत व्हिडीओ बनवले आणि फोटोही काढले. तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कारही केला.
- नराधमांनी तिला १५ मिनिटांपर्यंत ओलिस ठेवले आणि त्यानंतर तिचा मोबाईल नंबर घेऊन ते पळून गेले असे तरुणीने म्हटले होते. यानंतर लंका पोलिसांनी एफआयआर नोंदवत तपासाला सुरुवात केली होती.