सामूहिक बलात्कार प्रकरण: आरोपींना ३० तासांत ठोकल्या बेड्या, मोबाइल लोकेशनमुळे लागला छडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 09:20 AM2023-01-30T09:20:21+5:302023-01-30T09:21:15+5:30
Thakurli Gang rape case: पोलिस असल्याची बतावणी करीत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या ठाकुर्ली खाडी किनारी शुक्रवारी घडलेल्या गुन्ह्यातील दोघा आरोपींना पोलिसांनी ३० तासांच्या आत बेड्या ठोकल्या.
डोंबिवली : पोलिस असल्याची बतावणी करीत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या ठाकुर्ली खाडी किनारी शुक्रवारी घडलेल्या गुन्ह्यातील दोघा आरोपींना पोलिसांनी ३० तासांच्या आत बेड्या ठोकल्या. विष्णू सुभाष भांडेकर (वय २५, रा. नेवाळी नाका) आणि आशिष गुप्ता (वय ३२, रा. दत्त चौक नांदिवली रोड, डोंबिवली), अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपींच्या शोधासाठी पाच तपास पथके तयार केली होती. आरोपी हे नेहमीच खाडी किनारा परिसरात जात होते. त्यांनी अशा पद्धतीने आणखी काही मुली, महिलांना लक्ष्य केले आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत. यातील विष्णू हा घरफोडीतील सराईत गुन्हेगार असून, अलीकडेच तो जामिनावर सुटला होता. आशिष हा चहा टपरीवर काम करतो. शुक्रवारी दुपारी अल्पवयीन मुलगी आणि तिचा मित्र ठाकुर्ली पश्चिमेत रेल्वे स्थानकालगतच्या खाडीकिनारी फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी हे दोघे तरुण पीडित मुलगीकडे गेले. आम्ही पोलिस आहोत, असे सांगत त्यांना घाबरवले. तुमच्याबद्दल तुमच्या पालकांना सांगणार, असेही धमकाविले. पीडितेच्या मित्राला घटनास्थळापासून दूर नेत दोन्ही नराधमांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी त्याचे मोबाइल कॅमेरात चित्रीकरण केले. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर आम्ही तुझी समाजमाध्यमांवर बदनामी करू, अशी धमकी दिली होती.
मोबाइलवरून पटली ओळख
आरोपींनी बलात्कार करताना मोबाइलमध्ये चित्रण केले होते. मोबाइल ज्या कंपनीचा होता त्याची माहिती पीडितेने पोलिसांना दिली होती. त्यावरून घटनेच्या वेळी त्या परिसरात संबंधित कंपनीचे किती फोन ॲक्टीव होते, याची माहिती मिळविण्यात आली. त्याआधारे आरोपीपर्यंत पोहोचले.
निर्जनस्थळ टाळा
निर्जनस्थळी काही अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे अशा निर्जनस्थळी जाणे टाळावे, असे आवाहन सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांनी नागरिकांना केले आहे.