डोंबिवलीत सामूहिक बलात्कार; महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट, अल्पवयीन मुलीवर ३३ जणांकडून 9 महिने अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 06:02 AM2021-09-24T06:02:10+5:302021-09-24T06:05:22+5:30
पीडित मुलगी डोंबिवली ग्रामीण भागात राहते. जानेवारीत तिच्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवीत बलात्कार केला. त्या शरीरसंबंधांचा व्हिडीओ त्याने काढला अन्...
डोंबिवली (जि. ठाणे) : पुणे, मुंबईतील बलात्काराच्या अमानुष घटनांनी समाजमन सुन्न झाले असतानाच गुरुवारी डोंबिवलीतील १५ वर्षांच्या मुलीवर तब्बल ३३ नराधमांनी नऊ महिन्याच्या काळात आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मुलीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी २३ आरोपींना अटक केली. दोघे आरोपी अल्पवयीन असून उर्वरित आरोपी २० ते ३० वयोगटातील आहेत. काही आरोपी राजकीय पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पीडित मुलगी डोंबिवली ग्रामीण भागात राहते. जानेवारीत तिच्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवीत बलात्कार केला. त्या शरीरसंबंधांचा व्हिडीओ त्याने काढला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकर व त्याच्या मित्रांनी २९ जानेवारी ते २२ सप्टेंबर या काळात पीडितेवर डोंबिवली, बदलापूर, रबाळे, मुरबाड येथे सामूहिक बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी चार विशेष पथके स्थापन केली. १० फरारींचा शोध सुरू आहे.
महिला पोलीस अधिकाऱ्याकडे तपास
गुन्ह्याचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेऊन घटनेचा तपास स्थानिक पोलीस अधिकाऱ्याकडे न सोपवता ठाणे विभागाच्या महिला सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांची नेमणूक करण्यात आली आहे.
पीडितेची वैद्यकीय चाचणी; प्रकृती स्थिर
डोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीला कळवा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
पार्टीच्या नावाखाली व्हायचा लैंगिक छळ
- पीडित मुलीची आरोपींपैकी दोन तरुणांशी मैत्री होती. यातील एक तिचा प्रियकर असून, त्याने लग्नाचे आमिष दाखवीत तिच्यावर बलात्कार केला. या वेळी काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, त्याने व त्याच्या मित्राने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
- यानंतर या दोघांनी संबंधित व्हिडीओच्या आधारे त्या मुलीस धमकावून वेगवेगळ्या ठिकाणी
अन्य मित्रांच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या नावाखाली तिला बोलावून बलात्कार करण्याकरिता मित्रांच्या हवाली केले. या वेळी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार करण्यात आला.
बलात्कारासह पोक्सोअंतर्गत गुन्हा -
मानपाडा पोलीस ठाणे येथे ३७६, ३७६ (एन), ३७६ (३), ३७६ (ड) (अ)सह पोक्सो कायदा कलम ४.६.१० प्रमाणे गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराची घटना निंदनीय आहे. या प्रकरणासंदर्भात कठोर कारवाई करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. - एकनाथ शिंदे, पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री