कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; आरोपींमध्ये आमदाराचा मुलगा असल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 07:30 AM2022-06-04T07:30:15+5:302022-06-04T07:30:41+5:30
पीडित मुलीच्या वडिलांनी सामूहिक बलात्कारप्रकरणी १ जून रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली.
हैदराबाद : एका हायप्रोफाइल पार्टीला गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. ११ वी, १२ वी इयत्तेत शिकणाऱ्या पाच अल्पवयीन मुलांनी एका मर्सिडीज गाडीमध्ये हे गैरकृत्य केले. याप्रकरणी एका आराेपला अटक करण्यात आली असून इतर आराेपींची ओळख पटविण्यात आली आहे. या आरोपींमध्ये एक आमदार
व आणखी एक राजकीय नेता यांची मुले असल्याचे सांगण्यात आले.
२८ मे रोजी ही घटना घडली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी सामूहिक बलात्कारप्रकरणी १ जून रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेचे कलम ३५४ व पॉक्सो कायद्यान्वये याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींपैकी अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही. २८ मे रोजी पीडित मुलगी एका हायप्रोफाइल पार्टीसाठी एका पबमध्ये गेली होती. तिथून ती सायंकाळी साडेपाच वाजता घरी यायला निघाली.
आम्ही तुला घरी सोडू, असे पबमध्ये भेटलेल्या काही मुलांनी तिला सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून ती या मुलांच्या मर्सिडीज गाडीमध्ये बसली. त्या गाडीत पाच मुले व ही मुलगी, असे सहाजण बसले होते. या मुलांनी कार अंधाराच्या ठिकाणी नेली. कारमध्ये मुलीला बेदम मारहाण केली व तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुलीच्या अंगावर अनेक जखमा आहेत. बलात्काराच्या घटनेने मुलीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. आरोपींवर अतिशय कडक कारवाई करण्याची मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे. दरम्यान पबबाहेरील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची तपासणी सुरू केली आहे (वृत्तसंस्था)
पबमधील पार्टी मद्याविना असल्याचा दावा
पबमध्ये झालेल्या पार्टीत मद्याचा समावेश नव्हता, असा दावा त्या पबच्या मालकाने केला आहे. पबमधील पार्टीचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बलात्कार करणाऱ्या मुलांपैकी एकाची पीडित मुलीने ओळख पटविली होती. या आरोपींमध्ये एका आमदाराचा मुलगाही सामील असल्याची चर्चा आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.