सामूहिक बलात्कार; आतापर्यंत २९ जेरबंद, चार फरार आरोपींचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 12:28 PM2021-09-25T12:28:59+5:302021-09-25T12:31:42+5:30
डोंबिवलीतील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ३३ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
डोंबिवली: महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेत शुक्रवारपर्यंत २९ नराधमांना अटक केली आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी बाल सुधारगृहात केली आहे, तर चार आरोपींचा शोध सुरू असून, पोलिसांची चार विशेष पथके त्यांच्या मागावर असल्याची माहिती पोलीस अधिकारी सोनाली ढोले यांनी दिली. विविध आठ ठिकाणी नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला.
डोंबिवलीतील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ३३ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
पीडित मुलीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर पाच जणांनी बलात्कार केला. त्याचा व्हिडिओ काढून पुढे वेळोवेळी त्यांच्या मित्रांनीही तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींची घरे, पडक्या चाळी, लॉज अशा ठिकाणांचा यात समावेश आहे.
गुन्ह्यातील आरोपींचे वकीलपत्र घेऊ नका
डोंबिवलीत घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र कोणीही वकिलांनी घेऊ नये, असे आवाहन कल्याण जिल्हा फौजदारी न्यायालय वकील संघटनेचे पदाधिकारी ॲड. प्रकाश जगताप यांनी केले आहे. बलात्कार करणाऱ्या आरोपींचे वकीलपत्र वकील घेतात आणि तो सुटतो. त्यामुळे असे गुन्हे करणाऱ्यांचे मनोधैर्य वाढते. यात बलात्काराच्या गुन्ह्यांची संख्या कमी होण्याऐवजी ती दररोज वाढते. आपण स्वत: समाजातील घटक असल्याने समाजासाठी काहीतरी देणे लागतो. आपण जागृत होण्याची वेळ आलेली आहे, असे मत जगताप यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले आहे. दरम्यान, बलात्काराच्या वाढलेल्या घटना पाहता फौजदारी वकील संघटनेच्या सभासदांना सूचना करताना त्यांनी बलात्कारातील आरोपींचे वकीलपत्र महाराष्ट्रातील कोणत्याही वकिलांनीदेखील घेऊ नये, अशी विनंती केली आहे.