पैसे देण्यास नकार दिल्यामुळे तरुणीवर सामुहिक बलात्कार, प्रियकरालाही बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 07:09 PM2021-08-25T19:09:17+5:302021-08-25T19:10:03+5:30
Mysore GangRape Case: कर्नाटकातील म्हैसूरजवळील चामुंडी हिल्सवर ही धक्कादायक घटना घडली आहे.
म्हैसूर:कर्नाटकातील एका विद्यार्थिनीवर पैसे द्यायला नकार दिल्यानं सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच, तरुणीच्या प्रियकरालाही गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातीलम्हैसूरमध्ये ही घटना घडली आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 376-ड अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
एफआयआरनुसार, पीडित तरुणी मंगळवारी आपल्या प्रियकरासोबत म्हैसूर शहराजवळील चामुंडी हिल्सवर फिरायला गेली होती. सायंकाळी परत येत असताना एका टोळक्यानं त्यांना अडवलं आणि पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यामुळं आरोपींनी आधी तरुणाला बेदम मारहाण केली, नंतर त्या दोघांना तलिताद्रिपुरा परिसरात नेऊन तरुणीवर सामुहिक बलात्कार केला. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 376 ड अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.