रेल्वे स्थानकावर वेगवेगळ्या शकला लढवून प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 08:08 PM2018-07-27T20:08:20+5:302018-07-27T20:09:02+5:30
पोलिसांनी आरोपींची ओळख पटवण्यासाठी शेकडो सीसीटिव्ही तपासले
मुंबई - मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर नाना तऱ्हेच्या शकला लढवून प्रवाशांना लुटणाऱ्या सराईत आरोपींच्या टोळीचा कुर्ला रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कधी पैसे खाली पडले असल्याचे नाटक करून तर कधी मोबाइल हिसकावून, तर कधी चाकूचा धाक दाखवून हे चोरटे विविध स्थानकांवर नागरिकांना लक्ष करून लुटायचे.
मुंबईच्या कुर्ला रेल्वे टर्मिनल्सवर गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची कायमच वरदळ असते. त्यामुळे घाईगडबडित असलेल्या प्रवाशांना पैस पडले असल्याची बतावणी करून त्याचे लक्ष विचलीत झाल्यावर प्रवाशांचे सामान चोरणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकारचे गुन्हे ही दिवसेंदिवस वाढत होते. 11 जुलै रोजी गावी निघालेल्या दिपा मेहतानी यांना तीन चोरट्यांनी पैसे खाली पडले असल्याचे सांगून लक्ष विचलीत करून त्याची बँग चोरली. या बँगेत दिपा यांचे 13 लाख रुपयांचे सोने होते. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी आरोपींची ओळख पटवण्यासाठी शेकडो सीसीटिव्ही तपासले. अखेर आरोपींची ओळख पटल्यानंतर ही टोळी वांद्रे टर्मिनल्स येथे येणार असल्याची माहिती मिळाली. नंतर पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपी सुरेशकुमार पांडूरंगन याला धारावी पोलिसांनी अटक केली. सुरेशच्या चौकशीतून पोलिसांनी त्याचे साथीदार एम. सेथींलकुमार उर्फ महालिंगम, मूर्ती उर्फ नवनीथ कृष्णन यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा 8 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
तर दुसरीकडे विक्रोळीत पटरी शेजारील अंधाराचा फायदा घेऊन एकट्या प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून विक्की कुंचीकुर्वे व शोहेब अन्वर शेख यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी अशा प्रकारे अनेकांना लुबाडल्याची कबूली दिली आहे. तर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे महागडे मोबाईल आणि पाकिटं लंपास करणाऱ्या केतन मेहता याला ही पोलिसांनी कुर्ला येथून रंगेहाथ अटक केली आहे. केतनजवळून पोलिसांनी 7 महागडे , घरातून 8 मोबाईल आणि इतर ठिकाणी लपवलेले 20 मोबाईल हस्तगत केले आहेत. ज्याची बाजारात किंमत 4 लाख 67 हजार इतकी आहे. या सर्वांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.