पेट्रोलपंप लुटण्यासाठी आलेल्या सात जणांची टोळी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 07:01 PM2019-05-03T19:01:52+5:302019-05-03T19:13:05+5:30
गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, विविध हत्यारांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
नालासोपारा - मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेट्रोल पंप लुटण्याचा तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीला बुधवारी रात्री गस्तीदरम्यान वालीव पोलिसांनी गजाआड केले आहे. या टोळीकडून गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, विविध हत्यारे, दोन गाड्या, रिक्षेसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल करून या टोळीला जेरबंद केले असून यांनी कुठे कुठे दरोडे टाकले आहेत याचा शोध घेत तपास करत आहे.
वालीव पोलिसांची गुन्हे शाखेची टीम मुंबई अहमदाबाद महामार्गावर बुधवारी संध्याकाळच्या दरम्यान गस्त घालत होती. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास सातीवली ब्रिजच्या बाजूला असलेल्या सागर पेट्रोल पंपाजवळ इनोव्हा कार (एम एच 02 सी डी 4146) वॅगनर कार (एम एच 46 ए सी 1093) आणि रिक्षा (एम एच 04 जे क्यू 8323) या काही लोकांसह संशयास्पद उभ्या असलेल्या आढळल्या. पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन गाड्यांची झडती घेतली असता एक गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे, सुरा, कटर, लोखंडी पकड, नायलॉन रश्शी, हथोडी, छिन्नी, स्क्रुडायव्हर आणि काठी हा मुद्देमाल सापडला असून ते सागर पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आले असल्याचे तपासात उघड झाले आहे. वालीवच्या गुन्हे शाखेने श्रावण लालबहादूर यादव (30), प्रवीण शुकसागर वर्मा (29), गोविंदलाल शुकसागर वर्मा (33), मल्लिनाथ श्रीमंत डिगी (40), रणजित रामसिंग ठाकूर (43), नागराज लक्ष्मण गौडा (43) आणि सतीश अशोक झांबरे (27) या टोळीला अटक केले आहे. गुरुवारी वसई न्यायालयात या टोळीला हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.