पारख बिल्डरचे अपहरण करणाऱ्या टोळीला राजस्थानमध्ये बेड्या, १ कोटी ३० लाख जप्त

By अझहर शेख | Published: September 13, 2023 05:34 PM2023-09-13T17:34:52+5:302023-09-13T17:35:38+5:30

जोधपूरमधून क्राइम ब्रॅंचच्या पथकाने ठोकल्या बेड्या

Gang who kidnapped Parakh builder of nashik handcuffed in Rajasthan, 1 crore 30 lakh seized | पारख बिल्डरचे अपहरण करणाऱ्या टोळीला राजस्थानमध्ये बेड्या, १ कोटी ३० लाख जप्त

पारख बिल्डरचे अपहरण करणाऱ्या टोळीला राजस्थानमध्ये बेड्या, १ कोटी ३० लाख जप्त

googlenewsNext

नाशिक : येथील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे मागील आठवड्यात इंदिरानगरमधील त्यांच्या बंगल्यासमोरून अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्ते पहाटे पारख यांना सुरतजवळ सोडून गुन्ह्यतील बोलेरो जीपमधून फरार झाले होते. तेव्हापासून नाशिक शहर पोलिस याप्रकरणाचा कसोशीने तपास करत होते. अपहरणकर्त्यांचा माग काढण्यात गुन्हे शाखेच्या दोन्ही पथकांना यश आले आहे. तीघांच्या राजस्थानमधून तर एकाच्या वाडीवऱ्हेतून पोलिसांनी मुसक्या बांधल्या. राजस्थानमधील भारत-पाक सीमेजवळच्या अती दुर्गम अशा मौर्या गावातून १ कोटी ३३ लाख लाख रूपयांची खंडणीची रक्कमही जप्त केली आहे. 

इंदिरानगर भागातील श्रद्धा विहार कॉलनीमधील ‘निहिता’ बंगल्याजवळ मोबाइलवर बोलत असताना शनिवारी (दि. २) रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांचे चौघांनी अपहरण केले होते. यावेळी पांढऱ्या रंगाच्या बोलेरो कॅम्पर जीपमध्ये (आर.जे.४३ जीए६५५३) डांबून चौघांनी पळवून नेले होते. यावेळी त्यांचे दोघे साथीदार दुचाकीवर याठिकाणी रेकी करण्यास होते.

पारख यांचे अपहरण करण्यात आले होते. मात्र, अपहरणकर्ते कोण? अपहरण कशासाठी केले? गुजरात राज्यात त्यांना सोडून ते कोठे पसार झाले? अपहरण केले तर मग नेमके कोणत्या बोलीवर त्यांना सोडले? खंडणी उकळली गेली का? असे अनेकविध प्रश्न नाशिककरांना पडले होते. याबाबत उत्कंठा ताणली गेली असताना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने सलग आठ ते दहा दिवस कठोर परिश्रम घेत तांत्रिक पुराव्यांची साखळी जोडून अपहरणकर्त्यांचा माग थेट राजस्थानच्या जोधपूरपर्यंत काढला. तेथून संशयित आरोपी महेंद्र उर्फ नारायणराम बाबूराम बिश्नोई (३०,रा.मौर्या, ता.लोहावत.जि.जोधपुर), पिंटू उर्फ देविसींग बद्रीसीं बिश्नोई (२९,रा.राजेंद्रनगर, जि.पाली), रामचंद्र ओमप्रकाश बिश्नोई (२०,रा.फुलसरा छोटा गाव, जि.बिकानेर) आणि अपहरणाचा मास्टरमाइन्ड अनिल भोरू खराटे (२५,रा.लहांगेवाडी, वाडीवऱ्हे) अशा चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांचे तीन साथीदार हे अद्यापही फरार आहेत. गुन्ह्यात वापरलेली जीप व खंडणीच्या रकमेपैकी १ कोटी ३३ लाख रूपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. राजस्थान पोलिसांकडे तीघा संशयितांविरुद्ध विविध गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पथकाला ७० लाखांचे बक्षीस जाहिर

गुन्हे शाखा युनिट-१चे पथक व गुन्ह्याचे तपासी अधिकारी वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय ढमाळ, सहायक निरिक्षक हेमंत तोडकर, प्रविण सुर्यवंशी, उपनिरिक्षक चेतन श्रीवंत, विष्णू उगले, रविंद्र बागुल, नाजिम पठाण, विशाल काठे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, सुगन साबरे, येसाजी महाले,  मुख्तार शेख, जगेश्वर बोरसे वाहनचालक किरण शिरसाठ, शरद सोनवणे, प्रदीप म्हसदे, राहुल पालखेडे, योगेश चव्हाण या पथकाला पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ७० हजारांचे बक्षीस जाहिर केले आहे. तसेच आयुक्तालयाकडून उत्कृष्ठ गुन्हे तपास व उकल केल्याबद्दल प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

Web Title: Gang who kidnapped Parakh builder of nashik handcuffed in Rajasthan, 1 crore 30 lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.