दौंडमधील कासुर्डीत तरूणीवर सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 08:30 PM2018-12-12T20:30:08+5:302018-12-12T20:31:40+5:30
ऊसाच्या गु-हाळावर काम करणा-या मजूर तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिच्यासह कुटुंबाला डांबून ठेवण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
यवत : ऊसाच्या गु-हाळावर काम करणा-या मजूर तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिच्यासह कुटुंबाला डांबून ठेवण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दौंड तालुक्यातील खामगाव येथे ऑक्टोबरपासून हा प्रकार सुरु होता. पोलिसांकडे तक्रार द्यायला आलेल्या पिडीत मुलीच्या वडीलांचा मानसिक तणाव आल्याने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे.
याप्रकरणी यवत पोलिसांनी नदीम या परप्रांतीय ठेकेदारासह त्याच्या मोहसीन व दिलवाज या दोन कामगारांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव येथील गु-हाळावर पिडीत तरूणी व तीचे कुटुंबीय मजूर म्हणून काम करत होते. या गु-हाळाचा ठेकेदार ‘नदीम’ याने पिडीतेला (दि. १०) आक्टोबर रोजी कासुर्डी गावच्या हद्दीतील एका शेतात बोलावून घेतले. तेथे त्याचा भाऊ मोहसीन व साथीदार दिलवाज फुरकान (पूर्ण नावे माहीत नाहीत. तिघे रा. उत्तराखंड) या तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. हा प्रकार समजल्यावर पिडीतेच्या वडिलांनी संबंधितांना जाब विचारला. मात्र, आरोपींनी संपूर्ण कुटुंबालाच काही दिवस डांबून ठेवले.
आरोपींनी त्यानंतर दि. १७ आक्टोबर रोजी सात हजार पाचशे रुपये देऊन दौंड येथून दिल्लीला जाणा-या रेल्वेमध्ये बसवून दिले आणि कोणास काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र. संबधित पिडीतेने आपल्या गावी गेल्यावर कुटुंबीयांसोबत जाऊन गंगाहर पोलीस स्टेशन (ता. रूडकी, जि. हरिद्वार, राज्य उत्तराखंड) येथे संबंधितांविरूद्ध फिर्याद दिली. शून्य क्रमांकाने ही फिर्याद यवत पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. त्यावरून तपास करत यवत पोलिसांनी मोहसीन व दिलवाज यांना अटक केली आहे. दरम्यान, काल पिडीता व तीचे वडील मंगळवारी यवत पोलीस ठाण्यात आले. प्रचंड मानसिक तणावाखाली असलेल्या वडीलांचा बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पोलीस ठाण्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक नितीन लकडे पुढील तपास करीत आहेत.