बँक खात्यांतून रक्कम काढणारी टोळी उजेडात; ४० हॅकर्स अनेक राज्यांमध्ये सक्रिय; एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 03:13 AM2021-02-14T03:13:18+5:302021-02-14T06:33:41+5:30

Gangs withdrawing money from bank accounts : या टाेळीत कॉलिंग, रोख ट्रान्स्फर, विड्रॉलसाठी स्वतंत्र यंत्रणा काम करत असून, त्यापोटी त्यांना दोन ते पाच टक्के कमिशन दिले जात असल्याची बाब तपासात उघड झाली आहे.

Gangs withdrawing money from bank accounts come to light; 40 hackers active in several states; One arrested | बँक खात्यांतून रक्कम काढणारी टोळी उजेडात; ४० हॅकर्स अनेक राज्यांमध्ये सक्रिय; एकाला अटक

बँक खात्यांतून रक्कम काढणारी टोळी उजेडात; ४० हॅकर्स अनेक राज्यांमध्ये सक्रिय; एकाला अटक

Next

- सुरेंद्र राऊत

यवतमाळ : बँक खाते हॅक करून परस्पर रोख रक्कम काढणाऱ्या ४० सदस्यीय आंतरराज्य टोळीचा दिग्रस पोलिसांनी पर्दाफाश केला असून, टोळीच्या प्रमुख सदस्याला बिहारमधून गजाआड करण्यात आले आहे. या टाेळीत कॉलिंग, रोख ट्रान्स्फर, विड्रॉलसाठी स्वतंत्र यंत्रणा काम करत असून, त्यापोटी त्यांना दोन ते पाच टक्के कमिशन दिले जात असल्याची बाब तपासात उघड झाली आहे.  
विकासकुमार विनोदसिंह (रा. आजमपुरा, जि. नवादा, बिहार) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. त्याला त्याच्या मूळ गावातून दिग्रस पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्रसिंग बिलावत यांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून अडीच लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्याने २७ व २९ मे २०२० या दोन दिवसात ही रक्कम बँक खात्यातून काढली. याप्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात दोन महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अशा पद्धतीच्या २५ गुन्ह्यांची पडताळणी केली. औरंगाबाद, गडचिरोली, मुंबई, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक येथील फसवणूक झालेल्यांशी संपर्क करून गुन्ह्याची पद्धत जाणून घेतली. 
याप्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात दोन महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला असून, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा या राज्यांमध्ये या टोळीचे नेटवर्क आहे. संपूर्ण नेटवर्क पोलिसांच्या हाती लागू नये, म्हणून  कमिशन बेसिसवर टोळीतील प्रत्येकाला कॉलिंग ते विड्रॉलसाठी स्वतंत्र जबाबदारी दिली जात होती. 

असे चालते नेटवर्क
झारखंडमधील जामतारा येथून केवळ कॉलिंग करण्यात येते. पश्चिम बंगालमधून केवळ सिम खरेदी केली जातात. मिळालेला पैसा ओडिशात विविध खात्यात ट्रान्स्फर केला जातो. नंतर तो बिहारमध्ये बँक खात्यातून काढला जातो. या पद्धतीमुळे आजपर्यंत हे पूर्ण नेटवर्क कधीच उघड झाले नाही. कॉलिंग होणाऱ्या जामताराचा पुढे सुगावा लागत नाही. 

गुन्ह्याची पद्धत 
बँक खातेधारकाच्या मोबाइल सिमकार्डचा ॲक्सेस घेतला जातो.   त्यानंतर काही वेळासाठी सिम बंद पाडले जाते. सिम ॲक्सेसच्या माध्यमातून बँक खाते ऑपरेट करत ओटीपी जनरेट करून पैसे काढून घेतले जातात. सिमकार्ड सुरू झाल्यानंतर ग्राहकाला मॅसेज येत नाही. त्यामुळे खात्यातून पैसे काढल्याचे लगेच लक्षात येत नाही.  

१ कोटी ३८ लाख उकळल्याची कबुली 
ऑनलाइन पद्धतीने  बँक खाते हॅक करून लॉकडाऊन काळात तब्बल १ कोटी ३८ लाख रुपये जमविल्याची कबुली आरोपीने दिली. खात्यात आलेली एवढी मोठी रक्कम पाहून प्राप्तीकर विभागाने या आरोपीला नोटीसही बजावल्याचे पुढे आले आहे.

Web Title: Gangs withdrawing money from bank accounts come to light; 40 hackers active in several states; One arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.