गँगस्टर अबू सालेमच्या पुतण्याला अटक; उत्तर प्रदेश पोलिसांची वांद्रेत कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 09:27 AM2023-05-27T09:27:53+5:302023-05-27T09:28:00+5:30
आझमगढ पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, आरोपी हिना, तिचा पती सलाम आणि आरिफ यांनी शबाना परवीन यांची वडिलोपार्जित जमीन जबरदस्तीने हडप केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडपणे आणि खंडणी मागण्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी कुख्यात गँगस्टर अबू सालेमचा पुतण्या मोहम्मद आरिफ याला बेड्या ठोकल्या आहेत. वांद्रे परिसरातून ही कारवाई करण्यात आली आहे.
आझमगढ पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, आरोपी हिना, तिचा पती सलाम आणि आरिफ यांनी शबाना परवीन यांची वडिलोपार्जित जमीन जबरदस्तीने हडप केली. तिघांनीही या मालमत्तेवर कब्जा करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली होती. तसेच तिघांनीही संगनमताने खंडणीची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी परवीन यांच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा नोंदवत आरोपीचा शोध सुरू केला आहे.
आरिफ हा मुंबईतील वांद्रे परिसरात असल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना मिळाली. त्यानुसार, उत्तर प्रदेश पोलिसांनी मुंबईत येऊन एक विशेष मोहीम राबवून वांद्रे येथील हिल रोड परिसरातून आरिफला ताब्यात घेतले. गँगस्टर अबू सालेम याचा मोठा भाऊ अब्दुल हकीम याचा आरिफ हा मुलगा आहे. या गुन्ह्यात आरिफला अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी उत्तर प्रदेशमध्ये आणल्याचे उत्तर प्रदेशचे विशेष पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले.