मातोश्री अन् म्हाडा कार्यालयाजवळ सराईत गुंडाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 09:39 PM2020-03-01T21:39:13+5:302020-03-01T21:45:50+5:30
एका सराईत दरोडेखोराला गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-९च्या पथकाने रविवारी अटक केली.
मुंबई - वांद्रे पूर्व येथील म्हाडा कार्यालयाच्या पिछाडीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थान असल्याने मोठा पोलीस बंदिबस्त तैनात असतो. म्हाडा कार्यालयाच्या मागे आणि मातोश्रीनजीकच्या संरक्षण भिंतीजवळ गावठी पिस्तुल विकण्यासाठी आलेल्या एका सराईत दरोडेखोराला गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-९च्या पथकाने रविवारी अटक केली. इर्शाद निशात खान उर्फ बाबू हसन खान असे त्याचे नाव असून त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल ७ जिवंत काडतुसे जप्त केली.
म्हाडाच्या कार्यालयाच्या पिछाडीला संरक्षण भिंतीच्या पिछाडीला असलेल्या एक सराईत दरोडेखोर येणार आहे, अशी माहिती कक्ष-९चे हवालदार दृष्यंत कोळी व कॉन्स्टेबल संतोष लोखंडे यांना मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनासुसार त्यांनी सहकाऱ्यांसमवेत सापळा रचून पकडले. त्याची झडती घेतली असता पिस्तुल व जिवंत काडतुसे मिळाली. बाबू खान याच्याविरुद्ध मुंबईसह गुजरात राज्यात खून, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न आदी गुन्हे दाखल आहेत, त्याच्याकडून मुंबईतील गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता उपायुक्त अकबर पठाण यांनी वर्तविली.