वारे वसाहतीत पूर्ववैमनस्यातून गुंडावर हल्ला, दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 21:47 IST2023-08-01T21:46:17+5:302023-08-01T21:47:13+5:30
हल्लेखोर पळाला, धारदार शस्त्रांचा वापर

वारे वसाहतीत पूर्ववैमनस्यातून गुंडावर हल्ला, दोघे जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: वारे वसाहत येथे अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेली मिरवणूक पाहण्यासाठी गेलेल्या गुंडावर धारदार शस्त्राने हल्ला झाला. या घटनेत दोघे जखमी झाले. पृथ्वीराज विलास आवळे (वय २३) आणि प्रेम खंडू माने (वय १८, दोघे रा. वारे वसाहत, मंगळवार पेठ, कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत. यातील आवळे याची स्थानबद्धतेच्या कारवाईतून सुटका झाली आहे. घटनेनंतर हल्लेखोराने पळ काढला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अण्णा भाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने वारे वसाहत येथे मंगळवारी संयुक्त जयंती समितीने मिरवणुकीचे आयोजन केले. मिरवणुकीसाठी जोडलेली ध्वनियंत्रणा पाहण्यासाठी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड पृथ्वीराज आवळे तिथे गेला होता. त्यावेळी एका तरुणाने अचानक त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात आवळे याच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली. यावेळी झालेल्या झटापटीत प्रेम माने याच्या तळहातावर धारदार शस्त्राचा वार झाला. नागरिकांनी दोन्ही जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले. प्रथमोपचारानंतर आवळे याला खासगी रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी सीपीआरमध्ये जाऊन दोन्ही जखमींकडून घटनेची माहिती घेतली. ऋतिक साठे याने हल्ला केल्याचे आवळे याने सांगितले. प्रेम माने याच्यावर आवळे याने हल्ला केल्याची माहिती माने याच्या नातेवाईकांनी दिली. हल्लेखोर साठे हा घटनेनंतर पळाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मिरवणुकीपूर्वीच हल्ल्याची घटना घडल्याने वारे वसाहत परिसरात तणाव निर्माण झाला होता. जुना राजवाडा पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन बंदोबस्त तैनात केला. कडेकोट बंदोबस्तात मिरवणूक पार पडली. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अरविंद काळे, उपनिरीक्षक संदीप जाधव, प्रीतमकुमार पुजारी हे घटनास्थळी पोहोचले होते. याबाबत रात्री उशिरापर्यंत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.