तडीपार असून देखील शहरात वावरणाऱ्या कुख्यात बिलाल पटेलला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 03:28 PM2024-06-16T15:28:26+5:302024-06-16T15:28:50+5:30
बिलाल पटेलला चार जिल्ह्यातून २ वर्षांकरिता करण्यात आले तडीपार
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: चार जिल्ह्यातून २ वर्षां करिता तडीपार केले असताना देखील काशीमीरा भागात वावरणाऱ्या कुख्यात पटेल टोळीतील बिलाल पटेल ह्याला काशिगाव पोलिसांनी अटक केली.
काशिमीरा भागातील पटेल टोळीची दहशत व गुन्हेगारी कारवाया पाहता पोलिसांनी त्यांच्यावर तडिपारीच्या कारवाया केल्या आहेत. पटेल टोळीतील कुख्यात बिलाल गुलामरसूल पटेल ( वय ४९ वर्ष ) रा . काशिगाव ह्याला मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त यांच्या आदेशा नुसार ठाणे, पालघर, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर ह्या चार जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले आहे.
तडीपार असताना देखील पटेल हा काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वावरत होता . काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांनी तडीपार व्यक्ती आढळून आल्यास अटक करण्याचे निर्देश दिले होते . माशाचा पाडा मार्गावर ईद निमित्त पोलीस उपनिरीक्षक अभंजित लांडे व उपनिरीक्षक किरण बगडाणे सह अंमलदार किरण विरकर , धीरज राणे , राहुल वाळुंज , प्रवीण टोबरे हे गुरुवारी रात्री गस्त घालत होते.
पोलिसांच्या पथकाला पाहून एकजण रात्रीच्या वेळी लपण्याच्या प्रयत्न करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यावर पथकाने त्याला अडवून ताब्यात घेतले असता तो तडीपार असलेला कुख्यात बिलाल पटेल असल्याचे निष्पन्न झाले . त्याच्यावर काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक केली गेली . शुक्रवारी त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याची सुटका करत तडीपार काळात त्याने दिलेल्या पुणे जिल्ह्यातील लोणीकंद या ठिकाणी जाण्याचे आदेश बजावले .
माशाचा पाडा मार्गावर गौरशाह बाबा ट्रस्टची जमीन असून त्या ठिकाणी ईद निमित्त मोठ्या जनावरांच्या कुर्बानीसाठी बिलाल याने जागा भाड्याने दिली होती . परंतु त्याला विरोध झाल्यावर ती परवानगी रद्द केली गेली . ह्या घटने मुळे बिलाल हा काशिगाव भागातच बेकायदा वावरत असल्याचे उघडकीस आले होते .