गँगस्टर एजाज लकडावाला याला अटक, ८० हून अधिक तक्रारी, गुन्हे शाखेची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 06:20 AM2020-01-10T06:20:58+5:302020-01-10T06:21:06+5:30

गँगस्टर एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी बुधवारी बिहारमध्ये अटक केली.

Gangster Ejaz Lakdawala arrested, over 80 complaints, crime branch performance | गँगस्टर एजाज लकडावाला याला अटक, ८० हून अधिक तक्रारी, गुन्हे शाखेची कामगिरी

गँगस्टर एजाज लकडावाला याला अटक, ८० हून अधिक तक्रारी, गुन्हे शाखेची कामगिरी

Next

मुंबई : गँगस्टर एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी बुधवारी बिहारमध्ये अटक केली. एजाजची अटकेतील मुलगी शिफा हिच्या चौकशीतून तो येणार असल्याची माहिती मिळताच ही कारवाई झाली. दाऊद इब्राहिमचा हस्तक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एजाजने नंतर छोटा राजनच्या मदतीने टोळी तयार केली. राजनसह त्याने मलेशिया, केनिया, कॅनडा, स्वीत्झर्लंड व अरब देशांत प्रस्थ निर्माण केले. राजन व एजाजवर २००२ मध्ये बँकॉकमध्ये छोटा शकीलच्या हस्तकांनी गोळ्या झाडल्या होत्या. यात एजाज जखमी झाला होता. एजाज १९९२ ते २००८ पर्यंत छोटा राजन टोळीत होता. टोळीत आर्थिक खटके उडायला सुरुवात झाली. त्यामुळे एजाजने स्वत:ची टोळी सुरू केली.
एजाजविरुद्ध मुंबईत खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न आदी २५ गुन्हे नोंद असून ८०हून अधिक तक्रारी आहेत. आंतरराष्ट्रीय क्रमांकाचा वापर करून लकडावाला खंडणीसाठी फोन करून धमकावत असे. सहा महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. त्याच्या मुलीला २७ डिसेंबर रोजी अटक झाली. बनावट पासपोर्टच्या आधारे ती नेपाळला पळून जात होती. एजाजला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बिहार पोलिसांच्या मदतीने अटक केली. तो बनावट पासपोर्टच्या आधारे बिहारमध्ये आला. पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
>परदेशात मोठी संपत्ती
लकडावाला याचे कॅनडा, युनायटेड किंग्डम, अमेरिका, मलेशिया, कंबोडिया, नेपाळ या देशांत वास्तव्य असून, यापैकी त्याची कॅनडा, मलेशिया व लंडनमध्ये संपत्ती असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे. एजाजकडे दाऊदसंदर्भात बरीचशी माहिती असल्याच्या शक्यतेतून त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याच्या मुंबई व अन्य ठिकाणच्या साथीदारांचाही शोध सुरू आहे.

Web Title: Gangster Ejaz Lakdawala arrested, over 80 complaints, crime branch performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.