कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला जीवाचा धोका, दिल्लीतील तुरुंगात ठेवण्यास पोलिसांचा नकार...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 05:35 PM2023-06-11T17:35:29+5:302023-06-11T17:36:12+5:30
दिल्ली, पंजाब, यूपी, झारखंड, हरियाणा, राजस्थानमध्ये लॉरेन्स बिश्नोईची टोळी आता पसरली आहे. तो तुरुंगातून आपली टोळी चालवतो.
नवी दिल्ली: दिल्ली न्यायालयाने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या पोलीस कोठडीत 14 जूनपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने बिश्नोईची कोठडी पूर्ण झाल्यानंतर त्याला शहरातील कोणत्याही तुरुंगात ठेवू नये, त्याला थेट पंजाबच्या तुरुंगात पाठवावे, अशी मागणी तुरुंग प्रशासनाकडून होत आहे. यासाठी दिल्ली कारागृह प्रशासनाने न्यायालयात अर्ज केला आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने गुंडाची कोठडी पूर्ण झाल्यानंतर त्याला भटिंडा कारागृहात सोपवण्यास सांगितले आहे.
लॉरेन्स बिश्नोई बराच काळ भटिंडा मध्यवर्ती कारागृहात बंद होता. येथून त्याला गुजरात पोलिसांनी एका गुन्हेगारी खटल्याच्या तपासासाठी ताब्यात घेतले आणि गुजरातच्या साबरमती कारागृहात आणले. येथूनच दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका प्रकरणात ताब्यात घेऊन दिल्लीला आणले. या 11 जून रोजी लॉरेन्सला न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून पोलिसांची मागणी मान्य करत न्यायालयाने 14 जूनपर्यंत कोठडी वाढवली. यासोबतच दिल्ली तुरुंग प्रशासनाची मागणीही मान्य करण्यात आली असून, बिश्नोईची कोठडी पूर्ण झाल्यावर त्याला थेट भटिंडा कारागृहात सोपवण्यात यावे, असे म्हटले आहे. न्यायालयाने पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्याचे आदेशही दिले आहेत.
दिल्ली पोलीस काय म्हणाले?
लॉरेन्स बिश्नोईच्या दिल्ली तुरुंगात राहिल्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते, असे दिल्ली पोलिसांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. दिल्लीतील तिहार तुरुंगात नुकत्याच झालेल्या अनेक टोळीयुद्धातील हत्येमुळे तिहार प्रशासनावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. टिल्लू ताजपुरियाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीवर हल्ला केला जाऊ शकतो, अशी भीती तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. दिल्ली तुरुंग प्रशासन याबाबत अगोदरच सतर्क असून कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाही.
कारागृहातूनच गुन्हेगारी सिंडिकेट कार्यरत
लॉरेन्स बिश्नोईची टोळी आता दिल्ली, पंजाब, यूपी, झारखंड, हरियाणा, राजस्थानमध्ये पसरली आहे. सध्या लॉरेन्स बिश्नोई तुरुंगातून आपली टोळी चालवतो तर गोल्डी ब्रार कॅनडातून चालवतो. याशिवाय अमेरिकेतील लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि अझरबैजानमधील लॉरेन्सचा पुतण्या सचिन बिश्नोई हेदेखील बिश्नोई टोळी चालवत आहेत.