'ते' शक्तिप्रदर्शन भोवले; गॅंगस्टर शरद मोहोळला ५ साथीदारांसह पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 02:19 PM2021-02-17T14:19:35+5:302021-02-17T14:50:56+5:30
गेल्या महिन्यात कारागृहातून सुटलेला गॅंगस्टर शरद मोहोळ याच्याविरुद्धही खडक पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे.
पुणे: गुंड गजानन मारणे याची ३०० वाहनांच्या ताफ्यासह तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत निघालेली मिरवणूक सर्वत्र चर्चेचा विषय ठरली होती.या मिरवणुकीवरून राज्य सरकार, गृहमंत्री यांच्यासह पोलिसांवर देखील जोरदार निशाणा साधण्यात आला होता. त्यानंतर तळेगाव पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत मारणेसह ९ जणांना अटक केली. आता खडक पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातून बाहेर पडल्यावर जोरदार शक्ती प्रदर्शन करणाऱ्या गुंड शरद मोहोळ याच्यासह ५ साथीदारांना अटक केली आहे.
याप्रकरणी खडक पोलिसांनी गुंड शरद हिरामण मोहोळ (वय ३८), विश्वास बाजीराव मनेरे (वय ३७), मनोज चंद्रकांत पवार (वय ४२),स्वप्निल अरुण नाईक (वय ३५) आणि आणखी एकाला अटक केली आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात कारागृहातून सुटलेला गॅंगस्टर शरद मोहोळ याच्याविरुद्धही खडक पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. २६ जानेवारी रोजी एका संघटनेने आयोजित केलेल्या सत्यनारायण पूजेमध्ये शरद मोहोळ व त्याचे समर्थक आले होते. या वेळी बेकायदेशीरपणे लोकांना एकत्र करून परिसरात दहशत निर्माण करणे व कोविड १९ नियमांचे उल्लंघन करणे अशा विविध कलमांखाली शरद माेहोळ व त्याच्या १२ समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद मोहोळ हा संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकीच्या हत्या प्रकरणातील आरोपी आहे. पुणे शहरातील मोहोळ टोळीचा तो म्होरक्या आहे. येरवडा तुरुंगातील अंडा सेलमध्ये नाडीने गळा आवळून सिद्दीकीचा खून केल्याचा मोहोळवर आरोप होता. 15 दिवसांपूर्वीच मोहोळची कातिल सिद्दिकीच्या हत्या प्रकरणातून मुक्तता झाली होती.
कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यासह ९ जणांना अटक
तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर शहरात परतल्यावर कोथरूड परिसरात दहशत निर्माण करणे तसेच कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यासह ९ जणांना अटक केली असून १५० ते २०० समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे.