मास्क न वापरणाऱ्यांची दादागिरी; पोलीस पथकावर सोडले कुत्रे, एक पोलीस जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 08:20 PM2021-04-28T20:20:51+5:302021-04-28T20:21:39+5:30
People not use mask and attack on Police through dog in Dombivali : याबाबत रामनगर पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर, दोघांना अटक करण्यात आली आहे.
डोंबिवली : मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान तिघांनी केडीएमसीचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या अंगावर कुत्रे सोडल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजता खंबाळपाडा येथे घडली. कुत्र्याच्या हल्ल्यात एक पोलीस जखमी झाला आहे. याबाबत रामनगर पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर, दोघांना अटक करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आणि पोलिसांतर्फे मास्क न वापरणाऱ्यांविरोधात संयुक्त कारवाई सुरू आहे. खंबाळपाडा भागात मंगळवारी मनपाच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील भरारी पथकातील दिगंबर वाघ, शरद चोळके, अजित खाणे, प्रशांत जाधव यांच्यासह टिळकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अनिल तायडे व अन्य पोलीस कर्मचारी कारवाईसाठी फिरत असताना तेथील एका गॅरेजमध्ये तिघे जण विनामास्क बसले होते. पथकातील कर्मचाऱ्यांनी मास्क न घातल्याने तिघांना प्रत्येकी ५०० रुपये दंड भरण्यास सांगितले. मात्र, त्यांनी त्यास विरोध करत आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तसेच पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. यावेळी तेथे असलेल्या कुत्र्यांना छू म्हणताच त्यातील एका कुत्र्याने तायडे यांच्या पायाचा चावा घेतला. यात तायडे जखमी झाले आहेत. या बाबत रामनगर पोलीस ठाण्यात आनंद गुप्ता, सत्यनारायण गुप्ता आणि आदित्य गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर, आनंद आणि सत्यनारायण या पितापुत्राला अटक केली आहे. आदित्यचा शोध सुरू आहे.